मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी पश्चिम रेल्वेवर ब्लाॅक असून रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नाही.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ दरम्यान

परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील उपनगरी रेल्वेगाड्या माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या रेल्वेगाड्या माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील रेल्वेगाड्या मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड-माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील व माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर रेल्वे

कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी/ बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील उपनगरी रेल्वेसेवा रद्द करण्यात येईल. तसेच वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या डाऊन रेल्वेगाड्या सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप सेवा; तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप उपनगरी रेल्वेसेवाही बंद असतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल व कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान विशेष लोकल सुमारे २० मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : मुंबई सेंट्रल-माहीम अप व डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी मध्यरात्री १२.२५ ते पहाटे ४.२५ दरम्यान

परिणाम : ब्लाॅक कालावधीत चर्चगेट-सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लाॅक घेतला जाणार नाही.