मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने १ मे २०२६ पासून विद्यमान १२ डब्यांच्या १७ साध्या लोकल गाड्यांचे १५ डब्यांच्या सेवांमध्ये रूपांतर केले आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्यांदाच विरार ते डहाणू दरम्यान १५ डब्यांची लोकल धावणार आहें. तसेच १२ अतिरिक्त एसी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने हार्बर मार्गांवर एसी लोकलच्या जादा १४ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाढत्या उन्हापासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

किफायतशीर दर आणि वेगवान प्रवासा करिता मुंबईकर लोकलच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परिणामी लोकलला नेहमीच गर्दी असते. वाढत्या गर्दीला समावून घेण्यासाठी रेल्वेने १५ डब्याच्या लोकलची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे १५ डब्यांच्या लोकल सेवांची एकूण संख्या २२७ वरून २४४ पर्यंत वाढणार आहे. विशेष म्हणजे, विरार–दहाणू रोड मार्गावर प्रथमच १५ डब्यांच्या लोकल सेवा सुरू होणार असून, या मार्गावरील प्रवाशांना अधिक क्षमतेच्या गाड्यांचा फायदा होणार आहे. या १७ गाड्यांपैकी ८ सेवा प्रथमच विरार-डहाणू रोड दरम्यान धावणार आहेत. परिचालनाच्या कारणास्तव काही १५ डब्यांच्या लोकल गाड्या दोन्ही दिशांनी ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच, या गाड्या दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर ‘डबल हॉल्ट’ घेतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

१२ नव्या एसी फेऱ्या

१२ नव्या एसी लोकल सेवांमुळे एसी गाड्यांची संख्या लक्षणीय वाढणार आहे. कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) एसी सेवांची संख्या १३३ वरून १४५ पर्यंत, तर सुट्टीच्या दिवशी (शनिवार -रविवार) १०६ वरून ११८ पर्यंत वाढेल. या एसी सेवा विद्यमान १२ डब्यांच्या नॉन-एसी लोकलच्या जागी चालवण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या सर्व बदलांनंतरही पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवांच्या एकूण संख्येत कोणताही बदल होणार नाही. मात्र, या बदलांच्या अनुषंगाने काही लोकल सेवांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात येणार आहे.

१२ नव्या एसी लोकलचे वेळापत्रक

अप मार्ग-

सकाळी ५.२५ ची भाईंदर -चर्चगेट लोकल जलद

सकाळी ८.२८ ची विरार-चर्चगेट लोकल जलद

सकाळी १०.५० ची बोरीवली-चर्चगेट लोकल जलद

सायंकाळी ६.३२ ची मालाड-चर्चगेट लोकल जलद

रात्री ८.२५ ची बोरीवली-चर्चगेट लोकल धीमी

रात्री १०.५८ ची बोरीवली-चर्चगेट लोकल धीमी

डाउन मार्ग-

सकाळी ७.०३ ची चर्चगेट-विरार लोकल जलद

सकाळी ९.५६ ची चर्चगेट-बोरीवली लोकल जलद

सकाळी ११.५१ ची चर्चगेट-मालाड लोकल जलद

सायंकाळी ७.२५ ची चर्चगेट-बोरीवली लोकल जलद

रात्री ९.३९ ची चर्चगेट-बोरीवली लोकल धीमी

रात्री १२.१३ ची चर्चगेट- भाईंदर लोकल धीमी

हार्बर मार्गावर आणखी १४ नवीन एसी लोकल

मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा देत आणखी १४ नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल या मार्गावर १ मेपासून या फेऱ्या धावणार आहे. सध्या हार्बर मार्गावर १४ एसी लोकल फेऱ्या धावत आहेत. नव्या १४ फेऱ्यांची भर पडल्याने ही संख्या २८ वर पोहोचणार आहे. हार्बर मार्गावर दररोज सरासरी ४,५०० तिकिटांची विक्री होत असून, पासधारकांसह सुमारे ४० हजार प्रवासी एसी लोकलने प्रवास करतात.मध्य रेल्वेकडे सध्या सात एसी लोकल असून, त्यांच्यामार्फत दररोज ९४ फेऱ्या चालवल्या जातात. हार्बर मार्गावरील नव्या फेऱ्यांमुळे एकूण एसी फेऱ्यांची संख्या १०८ होणार आहे.