मुंबई : तांत्रिक अडचमींमुळे मध्य व पश्चिम रेल्वेवरील उपनगरी रेल्वेसेवा काही काळ विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवर मंगळवारी सकाळी अज्ञात प्रवाशाने आपत्कालीन साखळी खेचल्याने, तर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्याचे दरवाजे बंद होण्यास विलंब झाल्याने उपनगरी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी १०.२७ ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ठाण्याकडे जाणारी रेल्वेगाडी कांजूरमार्ग स्थानकात पोहोचली.

त्याच वेळी मोटरमनकडून चौथ्या डब्यातील आपत्कालीन साखळी अज्ञात व्यक्तीने खेचली. ही घटना सकाळी ११.२४ वाजता घडली. या घटनेमुळे उपनगरी रेल्वेगाडीचा काही काळ खोळंबा झाला. साखळी खेचण्याचे नेमके कारण तातडीने समजू शकले नाही. या घटनेमुळे काही उपनगरी रेल्वेगाडीचे वेळापत्रक कोलमडले.

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाडीचे स्वयंचलित दरवाजे वेळेवर बंद होत नसल्याने गाडी स्थानकातून वेळेत निघण्यास विलंब होतो. त्यामुळे त्यामागील साधारण रेल्वेगाडीवरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे उपनगरी रेल्वेगाडीची सेवा काही काळ विस्कळीत झाली. वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांमुळे सामान्य गाड्यांमधील प्रवाशांचा प्रवास रखडतो. दररोज सुमारे १५ ते २० फेऱ्या वातानुकूलित रेल्वेगाडीमुळे रखडतात. वातानुकूलित लोकलमधील गर्दी वाढल्याने, लोकलचा दरवाजा बंद होण्यास अडसर होत आहे. जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत उपनगरी रेल्वेगाडीचा सरासरी वक्तशीरपणा ९५.०७ टक्के नोंदविण्यात आला असून, मागील वर्षी याच कालावधीत तो ९५.३४ टक्के होता.