मुंबई : मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे सोमवारी लोकल सेवा विस्कळीत झाल्यानंतर, तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या लोकलमधून प्रवाशांना प्रवास करू न दिल्याच्या प्रकारावरून उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महासंघाने बुधवारी विभागीय मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची (डीआरएम) भेट घेतली. वारंवार मेगा ब्लॉक घेऊनही लोकल सेवेतील विलंब आणि गर्दी कमी होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

उपनगरी रेल्वे मार्गांवर आठवड्यातून अनेकदा मेगा ब्लॉक घेण्यात येतात. मात्र, त्यानंतरही लोकलच्या वेळापत्रकात अपेक्षित सुधारणा होत नसल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे. दररोज लोकल १५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने त्याचा परिणाम पुढील फेऱ्यांवर होतो. परिणामी, स्थानकांवर आणि लोकलमध्ये गर्दी वाढून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. वाढत्या गर्दीमुळे प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडत असतानाही या प्रश्नाकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची टीका महासंघाने केली.

मध्य रेल्वेवर सोमवारी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्याच दिवशी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या रिकाम्या लोकलमध्ये प्रवाशांना चढू दिले नसल्याचा प्रकारही घडला. गर्दीच्या काळात रिकामी लोकल उपलब्ध असतानाही प्रवाशांना प्रवेश नाकारल्याने लोकांमध्ये अपमानाची भावना असल्याचे उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितले.

कार्यालयीन वेळा बदलण्याच्या मागणीचा पाठपुरावा

मुंबईतील उपनगरी रेल्वेवरील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याची मागणी गेल्या १२ वर्षांपासून केली जात आहे. मुंब्रा येथील रेल्वे अपघातानंतर या विषयावर विचारविनिमय झाला होता, मात्र त्यानंतर या मागणीचा पाठपुरावा थंडावला. उपनगरी रेल्वेची प्रवासी क्षमता संपली असताना राज्य सरकारकडूनही अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची नाराजी महासंघाने व्यक्त केली.

रेल्वे प्रशासन राज्य सरकारकडे, तर राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखवले जाते. या दोन्ही यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. प्रवाशांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्व प्रवासी संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करावी आणि त्यातून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महासंघाने केली आहे. या बैठकीतून सकारात्मक निर्णय घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही महासंघाने व्यक्त केली.