मुंबई : मध्य रेल्वेच्या भांडूप स्थानकाजवळ गुरुवारी सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप दिशेची उपनगरी रेल्वेगाड्यांची वाहतूक ४८ मिनिटे विस्कळीत झाली. भांडुप स्थानकावरील अप धीम्या मार्गावरील सिग्नल सकाळी ७.४७ वाजता कार्यरत नव्हता. त्यामुळे अप दिशेच्या सर्व उपनगरी रेल्वेगाड्या सावधगिरीने मार्गस्थ करण्यात आल्या.
सिग्नल यंत्रणा कार्यरत नसल्याचे व त्यात गंभीर बिघाड झाल्याचे लक्षात येताच, मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने सिग्नल यंत्रणेची तपासणी करून बिघाड शोधण्याचे काम हाती घेतले. आवश्यक दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर, सकाळी ८.३५ वाजता अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. बिघाडामुळे अप धीम्या मार्गावरील उपनगरी रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.
सकाळी ६.४६ ची बदलापूर-सीएसएमटी, सकाळी ७.४४ ची ठाणे-सीएसएमटी व सकाळी ७.०९ ची कल्याण-परळ रेल्वेगाडी काही काळ रखडल्या होती. काही गाड्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या, तर काही रेल्वेगाडी पुढील मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे गाडीतील प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले.
मध्य रेल्वेवर सकाळीच अचानक बिघाड झाल्याने त्याचा प्रवाशांना फटका बसला. कसारा, कर्जत, खोपोली व कल्याणवरून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. उपनगरी रेल्वेसेवा बराच वेळ विस्कळीत झाल्याने, धीम्या मार्गावरील उपनगरी कूर्मगतीने धावत होत्या. कांजूरमार्ग, विक्रोळी येथून पवईच्या दिशेने जाणारे नोकरदार लोकलमध्ये बराच वेळ अडकून पडले होते. लोकल बराच वेळ स्थानकात येत नसल्याने ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली होती.
