मुंबई : पश्चिम रेल्वेने नव्या उपनगरीय वेळापत्रकात काही जलद लोकलचा बोरिवली थांबा रद्द केल्यानंतर आता मध्य रेल्वेवरील कसारा आणि आसनगाव जलद लोकलचे डोंबिवली व दिवा येथील थांबेही रद्द करण्याची मागणी ‘कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर’ने केली आहे. डोंबिवली, दिवा येथे थांबा दिल्याने कसारा, आसनगाव लोकलमधील गर्दीचे प्रमाण वाढते. मुंब्रा स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर गर्दीच्या स्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
दिवा आणि डोंबिवली या स्थानकांवर जलद लोकलमध्ये चढ-उतार करताना मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे दररोज धक्काबुक्की, हाणामारी आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पश्चिम रेल्वेने प्रवासी व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन लक्षात घेऊन काही लोकलचा बोरिवली थांबा रद्द केला आहे. त्याच धर्तीवर मध्य रेल्वेने कसारा व आसनगाव जलद लोकलचे डोंबिवली आणि दिवा येथील थांबे कायमस्वरूपी रद्द करण्याचा विचार करावा, असे संघटनेने म्हटले आहे.
गेल्या काही वर्षात दिव्यातील लोकांची संख्या वाढल्याने, दिव्यातून प्रवाशांचा प्रवास गर्दीचा होऊ लागला. गर्दी विभाजित करण्यासाठी जलद लोकलला दिवा स्थानकात थांबा देण्यास सुरुवात झाली. कसारा, आसनगाववरून सुटणाऱ्या जलद लोकलला दिवा येथील थांबा असल्याने, लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढले आहे. तसेच, डोंबिवलीवरून सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि सीएसएमटीवरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी इतर लोकलची सुविधा असल्याने, कसारा, आसनगाव जलद लोकलचा थांबा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दिवा आणि डोंबिवली स्थानकांतून मोठ्या प्रमाणावर प्रवासी लोकलमध्ये चढतात आणि दरवाजावर गर्दी करतात. तसेच दरवाजावर गर्दी केल्याने, अपघाताचा धोका वाढतो. मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंब्रा परिसरात लोकलचा वेग कमी करण्याव्यतिरिक्त कोणताही कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात आलेली नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेने ज्याप्रमाणे बोरीवली स्थानकाबाबत निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, त्याच धर्तीवर मध्य रेल्वेनेही निर्णय घ्यावा. – उमेश विशे, सचिव, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन
जलद लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण
डोंबिवली येथे घरांच्या किमती वाढल्याने, जवळील रेल्वे स्थानक दिवा येथे स्वस्तातील घरे घेण्यास नागरिकांनी पसंती दर्शवली. त्यानंतर हळूहळू बेसुमार चाळी, बांधकामे, इमारती उभ्या झाल्याने गर्दीचा लोंढा वाढला. सध्या दिव्यावरून सुमारे १ लाख ३० हजार प्रवाशांचा प्रवास होतो. दिव्यावरून एकूण ४९० लोकल धावतात. यामध्ये दिवा डाऊन धीम्या २२३ लोकल फेऱ्या, अप धीम्या २१५ लोकल फेऱ्या धावतात. तर, २५ अप आणि २७ डाऊन जलद लोकलला दिवा येथे थांबा दिला जातो. या ५३ लोकल फेऱ्यांना दिवा येथे थांबा दिल्याने, या जलद लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढले आहे.
