मुंबई : मुंबईच्या उपनगरीय लोकलचे देशासह परदेशी पर्यटकांना आकर्षण आहे. लोकल प्रवासादरम्यान अनेक विचित्र घटना घडत असतात. अशाच एका घटनेची चित्रफीत सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून नेटकरी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. लोकलमधील महिलांच्या डब्यात शिरलेल्या एका झुरळाने मोठा गोंधळ उडाला. झुरळापासून स्वताला वाचवण्यासाठी डब्यात गर्दी असूनदेखील महिला चक्क आसनावर चढून उभ्या राहिल्या. महिलांचा गोंधळ पाहून नेटकऱ्यांनी लाडक्या बहिणी झुरळाला घाबरतात असे विनोदाने म्हटले आहे.
मुंबईत पहाटेपासून रात्री उशिरापर्यत महिला एकट्याने प्रवास करतात. एका विदेशी महिलेने मुंबईत महिला सुरक्षित असल्याबाबत शहराचे कौतुक केले होते. मुंबईतील महिला रोज कामानिमित्त कित्येक किलोमीटरचा प्रवास धाडसाने करतात. प्रत्येक परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी त्या सदैव तयार असतात. मात्र याच धाडसी मुंबईकर महिलांना चक्क एका झुरळाने नाचवले आहे. लोकलमधील एक चित्रफीत समाजमाध्यमांवर सध्या प्रसारित होत असून महिलांच्या डब्यात एक झुरळ शिरले आणि त्याला घाबरून महिलांनी एकच गोंधळ घातला. किंबहुना काही जणी आसनावर उड्या मारू लागल्या.
महिलांच्या डब्यात एका झुरळाचा शिरकाव झाल्याचे या चित्रफीतीत दिसत आहे. ते पाहताच महिलांनी एकच गोंधळ घातला. खरे तर एक फटका मारला असता तरी ते झुरळ मेले असते. पण बहुधा कोणीही ते धाडस करण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे झुरळ आपल्या अंगावर येऊ नये म्हणून काही महिला थेट आसनावर उभ्या राहिल्या आहेत, तर काही जणी मोठ्याने आरडाओरडा करत आहेत. ही चित्रफीत आतापर्यंत २ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेली आहे. तसेच अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणते आहे, “लाडक्या बहिणी झुरळाला घाबरल्या, ” तर कुणी, “मुंबईमध्ये कधी काय घडेल, सांगता येत नाही. ” यापूर्वी महिलांच्या डब्यात एक पाल शिरल्याची घटना घडली होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
