उपनगरीय लोकलमध्ये २५ जून रोजी पावसाचे पाणी डब्ब्यात येत असल्यामुळे दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादाचे परिवर्तन चाकू हल्ल्यात होऊन नालासोपारा येथील एका २२ वर्षीय तरुणाला त्याचे प्राण गमवावे लागले. याचवर्षी २५ जानेवारी रोजी मलाड रेल्वे स्थानकात एका प्राध्यापकांवर तुरळक वादावरून सुरीने हल्ला करून त्याचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटना प्रथम वर्गाच्या डब्ब्यात घडल्या हे महत्वाचे! डहाणू ते वसई- विरार आणि पुढे चर्चगेट पर्यंत दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना अशा वादावादीच्या परिस्थितीला कधी ना कधी सामोरे जावे लागत असून निराकरण करण्याच्या दृष्टीने रेल्वे तसेच पोलिसांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे.
पावसाळ्यात व थंडीच्या दरम्यान दरवाजे, खिडक्या बंद व उघडे ठेवण्यावरून प्रवाशांमध्ये नेहमी खटके उडत असतात. विशेषतः दरवाजे बंद केल्यानंतर अनेकदा डब्यांमध्ये गुदमरल्या सारखी स्थिती निर्माण होत असल्याने अथवा दरवाजे उघडे ठेवल्यास पावसामुळे प्रवासी भिजले जात असल्याने तणावाचे वातावरण होत असते. सध्याच्या समाज माध्यमांच्या आहारी गेलेले प्रवासी त्यांच्या मोबाईलमधील स्पीकर सुरु ठेवून अथवा मोठ्या आवाजात संभाषण करणे, गाणी, सिनेमा किंवा मोबाईल वरील इतर मनोरंजनाचे साहित्य बघत असतात. तर लांबपल्ल्या गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी दिवा सुरू बंद ठेवण्याच्या कारणांवरून भांडणाचे प्रकार अलीकडेही घडल्याची उदाहरणे आहेत.
असे असताना डहाणू ते विरार दरम्यानच्या प्रवासामध्ये इतर प्रवाशांसोबत होणाऱ्या संघर्षाचे विषय काहीसे वेगळे आहेत. दैनंदिन प्रवासाच्या गाड्यांमध्ये पुढील स्थानकांमधून चढणाऱ्या आपल्या सहकाऱ्यासाठी जागा राखीव ठेवणे किंवा जागा (आसन) असताना देखील त्रयस्त प्रवाशालाही उपलब्ध करून न देणे ही कारणे अधिक प्रमाणात दिसून येतात. विशेषतः दैनंदिन प्रवाशांच्या करीता महत्त्वपूर्ण असणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजरमध्ये असे प्रकार घडत असून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस असमर्थ ठरले आहेत.
विरार स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने मुंबईकडे दर १५-२० मिनिटाच्या अंतराने उपनगरीय सेवा उपलब्ध असली तरीही वलसाड फास्ट पॅसेंजर, लोकशक्ती एक्सप्रेस व विरार येथे थांबणाऱ्या इतर लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये विरारचे प्रवासी वैतरणा किंवा सफाळे स्थानक पर्यंतचा सीजन तिकीट (पास) काढून प्रवास करत असल्याने वादविवाद निर्माण होत असतात. विशेष म्हणजे सायंकाळी परतीच्या प्रवासादरम्यान विरार स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांमुळे दोन- तीन मिनिटे स्थानकात थांबणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अल्पावधीत विरार येथून चढणे कठीण होत असते. शिवाय डहाणूसाठी मुंबईहून असणाऱ्या थेट उपनगरीय सेवांमध्ये देखील वसई विरार येथील प्रवाशांची संख्या लक्षणीय असल्याने यामुळे देखील भांडणे व वाद होण्याचे प्रकार घडत असतात.
प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये विना तिकीट अथवा दुसऱ्या दर्जाचे तिकिटधारक प्रवास करत असल्याचे प्रकार वारंवार घडत असतात. त्यामुळे जादा पैसे मोजणाऱ्या प्रथम दर्जाच्या तिकिट धारकाला अशा परिस्थितीत बसण्यासाठी आसन मिळवणे कठीण बाब ठरते. विशेषतः महिलांच्या डब्यात अथवा पासधारकांकरिता राखीव डब्यामध्ये सर्वसाधारण तिकीट धारक आल्यास त्याच्यावर उतरेपर्यंत उपरोधिकपणे शाब्दिक मारा केला जातो. अशावेळी वयोवृद्ध, सोबत लहान मुलगा अथवा महिला असल्यास प्रवाशांनी प्रत्युत्तर दिल्यास हमखास हाणामारी होण्याचे प्रकार घडतात.
धावत्या गाडीमध्ये असे प्रकार घडल्यास साखळी खेचून गाडी थांबवण्याचे धाडस अलीकडच्या काळात सहजासहजी प्रवासी करत नसल्याचे दिसून येते. आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांचा त्यानंतर होणारा जाच व तक्रार नोंदवण्यासाठी गाडी सोडून पुढील स्थानकात उतरण्यासाठी प्रवासी सहसा तयार होत नाहीत.
उपनगरी गाड्यांमध्ये होणारी तुफान गर्दी पाहता अशा ठिकाणी तिकीट तपासणी अथवा पोलिसांना गस्तीसाठी पाठविणे सहज शक्य होत नाही. काही ठिकाणी असे वाद डब्यामधील सीसीटीव्ही अथवा इतर सहप्रवासाने मोबाईलमध्ये चित्रीकरण करून बंदिस्त केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पुरावा उपलब्ध होतो. सर्वसामान्य प्रवाशांवर सहप्रवाशांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या स्तरावर उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे.
विरार ते डहाणू दरम्यान उपनगरीय सेवांची संख्या वाढविणे, बोईसर व पालघर येथून दादर अथवा चर्चगेट पर्यंत धावणाऱ्या थेट सेवा सुरू करणे गरजेचे झाले आहे. त्याचप्रमाणे मुंबईहून परतीच्या प्रवासा दरम्यान डहाणू सेवेच्या पूर्वी किमान दोन सेवा विरारसाठी सुरू केल्यास डहाणूकडे धावणाऱ्या उपनगरीय गाड्यांमध्ये अंधेरी व बोरिवली येथून गाडीत चढण्यासाठी होणारी अडचण व पर्यायाने होणारा संघर्ष कमी होऊ शकेल. गर्दीच्या वेळी प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये तिकीट तपासणी करणे त्रासदायक ठरत असले तरी विविध रेल्वे स्थानकांमध्ये उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी सीसीटीव्ही व्यवस्था उभारणे व तपासणी करणे सहज शक्य आहे.
विविध डब्यांमध्ये तसेच महिलांच्या डब्यांमध्ये भाजीपाला व मासळी घेऊन प्रवास करणाऱ्या लगेज पॅसेंजर यांच्याकरिता आवश्यक व्यवस्था करून प्रवासी डब्यांमध्ये त्यांच्या सामानामुळे होणारे वाद कमी करणे शक्य होणार आहे. तर रेल्वे सेवेच्या उगम स्थानाकडे पूर्वीच्या स्थानकांवरून काही प्रवासी विरुद्ध दिशेने प्रवास करून (रिटर्न) जागा बळकवून राहणाऱ्या विरुद्ध देखील रेल्वे प्रशासनाने धोरण आकडे गरजेचे झाले आहे.
सुरक्षिततेच्या नावाखाली रेल्वे व्यवस्थापन वेगवेगळ्या उपायोजना करीत असताना प्रत्येक डब्यामध्ये आवश्यक सीसीटीवी उभारणे सहजच शक्य असून प्रवाशांसाठी असणाऱ्या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन पोलीस स्थानकात कारवाई करण्याची पद्धती अवलंबली गेल्यास प्रवाशांमध्ये होणारा संघर्ष कमी होऊ शकेल.
