मुंबई : नोकरी, व्यवसाय, इत्यादी निमित्ताने रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या गरोदर महिलांना सुरक्षित व आरामदायक प्रवास करता यावा, यासाठी उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये गरोदर महिलांसाठी एक स्वतंत्र डबा आरक्षित ठेवण्यात यावा अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबई महानगराची जीवनवाहिनी असून, ह्या रेल्वेमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. या प्रवाशांमध्ये नोकरी, व्यवसाय, इत्यादी निमित्ताने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलांची संख्यादेखील लक्षणीय असून अशा महिलांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. गर्दीमुळे त्यांना उभ्याने करावा लागतो. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी उपनगरी रेल्वेच्या गाड्यांमध्ये एक डबा आरक्षित ठेवावा अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. त्यांची ठरावाची सूचना येत्या महासभेच्या पटलावर ठेवण्यात आली आहे.
स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की, गर्भवती महिलांची शारीरिक स्थिती अतिशय नाजूक असते. अतिशय गर्दीच्यावेळी रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणे गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळासाठी धोक्याचे ठरू शकते. रेल्वेगाड्यांमध्ये दिव्यांग व्यक्ती, कर्करोगी रुग्ण यांच्यासाठी स्वतंत्र डब्याची व्यवस्था आहे. मात्र, गर्भवती महिलांसाठी रेल्वेगाड्यांमध्ये स्वतंत्र डब्याची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करावा लागतो. गर्दीच्यावेळी बऱ्याच वेळा दिव्यांगांच्या डब्यामध्येही प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे तेथेही महिलांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. अशा परिस्थितीत पूर्णवेळ उभ्याने प्रवास केल्याने, त्यांना त्रास होतो. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, इत्यादी निमित्ताने रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या गरोदर महिलांना सुरक्षित व आरामदायक प्रवास करता यावा, यासाठी उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये गरोदर महिलांसाठी एक स्वतंत्र डबा आरक्षित ठेवण्यात यावा, असे शिंदे यांनी प्रस्तावात म्हटले आहे.
विशेष म्हणजे शिंदे यांनी केलेल्या मागणीवरील निर्णय हा रेल्वेच्या अखत्यारीतील आहे. रेल्वेचा विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असून केंद्रातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या या मागणीवर प्रशासन काय अभिप्राय देणार याबाबत उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता असून केंद्रातही भाजपची सत्ता असल्यामुळे ही मागणी प्रत्यक्षात पूर्ण होते का हे समजू शकणार आहे.
