स्टंटबाजी जिवावर बेतली?

रेल्वे लोकलच्या डब्यावर चढणे, दरवाजात लटकणे, खिडक्यांवर उभे राहून प्रवास करणे यांसारखे अनेक स्टंट तरुणांकडून केले जातात.

रेल्वे लोकलच्या डब्यावर चढणे, दरवाजात लटकणे, खिडक्यांवर उभे राहून प्रवास करणे यांसारखे अनेक स्टंट तरुणांकडून केले जातात. हीच स्टंटबाजी त्यांच्या जिवावर बेतू शकते याचे भानही त्यांना नसते. मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांचा स्टंटबाजीमुळे बळी गेला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणावर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी पहाटे चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या पहिल्या लोकलमधून ते प्रवास करत होते. सिद्धिविनायक मंदिरात रात्री अनेक जण दर्शनासाठी येतात. त्यांची गर्दी या ट्रेनमध्ये असते. पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांनी ही ट्रेन वांद्रे येथून सुटली त्यावेळी अवघ्या काही वेळेत दारात उभे असलेले दोन तरुण ट्रेनमधून खाली पडले. गंभीर जखमी असलेल्या या दोन्ही तरुणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे.  हे दोन्ही तरुण १९ आणि २१ वर्षे वयोगटातील आहे. जखमी तरुणाचे नाव अल्ताफ शेख असल्याचे पोलीस निरीक्षक पडवी यांनी सांगितले.

शीळफाटा दुर्घटनेतील आरोपीचा जामीन नामंजूर
ठाणे : शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमधील सात मजली इमारत दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला महापालिकेचा अभियंता रमेश इनामदार याचा जामीन अर्ज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केला. ठाणे न्यायालयाने यापूर्वीच इनामदारचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. याप्रकरणी त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
लकी कंपाऊंडमधील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात रमेश इनामदार यालाही अटक झाली होती.

पत्नीची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला
मुंबई : मीरा रोड येथे राहणाऱ्या गिरीश कोटे याने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. मीरा रोडच्या गोल्डन नेक्स्ट परिसरात नक्षत्र टॉवरच्या १४व्या मजल्यावर हे जोडपे गेल्या सहा महिन्यांपासून भाडय़ाने राहात होते. कोटे याने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेहाचे तीन तुकडे केले व ते फ्रीजमध्ये ठेवले होते. याप्रकरणी नवघर पोलिसांनी गिरीशला अटक केली असून अधिक तपशील मिळू शकलेला नाही.

पोलिसावर मद्यपीचा हल्ला
मुंबई : जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वसंत कदम यांच्यावर एका मद्यपीने हल्ला केल्याने ते जखमी झाले. मंगळवारी सकाळी नळबाजार येथे ही घटना घडली. नळबाजार येथील जरीवाला इमारतीत राहणाऱ्या फातिमा हरयाणावाला या महिलेला तिचा मुलगा मद्याच्या नशेत मारहाण करत होता. त्यासाठी तिने पोलिसांना दूरध्वनी करून मदत मागितली होती. पोलीस हवालदार वसंत कदम (४०) हे फातिमा हरयाणावाला यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना मारहाण करणारा आरोपी हुजेफा अब्बास अली हरयाणावाला (३२) याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता हुजेफाने कदम यांनाच मारहाण केली. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai local train stunt youth died one injured

ताज्या बातम्या