मुंबई – लोकलमध्ये झालेल्या चाकुल्ल्यानंतर प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्टेशन परिसरातील गर्दुल्ले, सोनसाखळीचोर, पाकिटमार यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे पोलिसांसोबत गृह विभागाची संयुक्त बैठक १५ दिवसांत आयोजित केली जाईल. महिला डब्यात महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री ९ वाजल्यापासून ६ वाजेपर्यंत पोलीस असतात त्यांची वेळ सकाळी ८ वाजेपर्यंत केली जाईल. गर्दुल्ल्यांबाबतची माहिती गोळा करून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे अश्वासन रेल्वे सुरक्षेसंदर्भातील लक्षवेधीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी दिले.

मुंबई लोकलमध्ये २३ जून रोजी नालासोपारा लोकलमध्ये झालेल्या तरुणाची हत्या तसेच रेल्वेमध्ये वाढलेली गुन्हेगारी आणि सुरक्षेच्या प्रश्नावर विधान परिषदेत आमदार रवींद्र फाटक यांनी लक्षवेधी सूचना मांडली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी शिवसेनेचे (ठाकरे) अॅड. अनिल परब यांनी रेल्वे स्थानक परिसरातील गर्दुल्ल्यांच्या उपद्रवावर सरकार काय उपायोजना करणार असा सवाल करताना साध्या वेशातील पोलिसांची गस्तच थांबल्याचे त्यांनी सांगितले. भाईजगताप यांनीही गर्दीमुळे होणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या अपघाताकडेही लक्ष वेधले तर आमदार राजहंस सिंह यांनीप्रत्येक रेल्वेडब्यात बंदुकधारी सुरक्षा गार्ड नेमण्याची मागणी केली.

आमदार चित्रा वाघ यांनी महिला डब्यात असणाऱ्या पोलीसांची वेळ वाढविण्यात यावी अशी मागणी केली असता योगेश कदम यांनी सरकारची बाजू स्पष्ट करीत रेल्वे सुरक्षा, महिलांच्या सुरक्षेबाबत करण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती दिली. अपघातप्रवण ठिकाणांचा आढावा घेऊन तेथे विशेष सुरक्षा उपाययोजना राबविण्यत येतील. रेल्वेस्थानक, रेल्वे ट्रॅक तसेच स्थानकांमध्ये अमलीपदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तिंविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येईल. पुढील १५ दिवसांत रेल्वे पोलिसांची उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल. सोनसाखळी चोर, त्याचप्रमाणे जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगार यांच्याविषयी उपलब्ध असलेल्या नोंदींवरून त्यांच्या नियमित हालचालींचा आढावा घेतला जाईल. रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांच्या संयुक्त विशेष मोहिमेद्वारे सर्व स्थानकांवर तपासण्या वाढविण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.

रेल्वे अपघातात १७ महिन्यांत २२८८ मृत्यू

रेल्वे अपघातात वर्ष २०२५ पासून मे २०२६ अखेर तब्बल २२८८ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाले आहेत. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता २०२३ मध्ये १८९५, २०२४ – १७४४, २०२५ – १६१२ जणांनी रेल्वे अपघातात आपला जीव गमावला आहे. यावर काय उपाययोजना करणार असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. यावर रेल्वेची संख्या आणि जास्तीतजास्त लोकल १५ डब्यांच्या करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात ओल

सुरक्षेसाठी अशा केल्या उपाययोजना

उपनगरीय लोकलने दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. कार्यक्षेत्रातील १७७ रेल्वे स्थानकांवर ६८९९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रेल्वे पोलिसांच्या मदतीसाठी २००० होमगार्ड व १५० एमएसएफ सुरक्षारक्षक मंजूर करण्यात आले असून त्यापैकी अनुक्रमे १५२० होमगार्ड व ११२ एमएसएफ हजर आहेत.

रेल्वे स्थानकांवर पोलिसांची गस्त, व्हिसिबल पोलिसिंग करण्यात येते. संशयित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक साधने, चेहरा पडताळणी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले. प्रत्येक स्टेशनवर संशयित बॅगेची तपासणी करण्यात येत आहे. तसेच टर्मिनसच्या ठिकाणी बॅगांची स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात येते. आपत्कालीन काळात मदत मिळवण्यासाठी १५१२ हेल्पलाईन २४ तास कार्यान्वित. यानुसार आलेल्या १ लाख ५६ हजार तकारी आल्या असून ५३ हजार प्रवाशांना ४ कोटी ३६ लाख परत दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.