मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त दोन महिलांनी धावत्या लोकलमध्ये धोकादायक स्टंटबाजी केल्याचे समोर आले आहे. तिरंग्याच्या रंगातील साड्या नेसून ‘आय लव्ह माय इंडिया’ गाण्यावर ध्वनिचित्रफित तयार करण्यासाठी या महिला लोकलच्या दरवाज्यातून बाहेर लटकताना दिसत आहेत. या प्रकाराची ध्वनिचित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाला असून, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रसारित ध्वनिचित्रफितीमध्ये दोन महिला धावत्या लोकलच्या दरवाजात उभ्या असल्याचे दिसते. लोकल वेगाने धावत असतानाही दरवाजाबाहेर लटकून या महिला स्टंटबाजी करीत होत्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंग्याच्या रंगातील साड्या परिधान करून आणि देशभक्तीपर गाण्यावर ही ध्वनिचित्रफित तयार करण्यात आल्याचे दिसून आले.
रील्ससाठी जीव धोक्यात
समाज माध्यमावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धावत्या लोकलच्या दरवाजात स्टंट करण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. मात्र, अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये क्षणभराचा निष्काळजीपणाही जीवघेणा ठरू शकतो. फलाट, खांब, सिग्नल किंवा अन्य रेल्वे संरचनेला धडकण्याचा धोका असतानाही संबंधित महिला बिनधास्तपणे स्टंट करताना दिसत आहेत. लोकल दरवाजात लटकून प्रवास करणे किंवा धावत्या लोकलमध्ये अशा प्रकारे स्टंट करणे हे प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे समाज माध्यमावरील प्रसारित ध्वनिचित्रफितीची रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी दखल घेऊन संबंधित महिलांची ओळख पटवावी आणि नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
देशभक्तीचा उत्साह स्वागतार्ह; मात्र त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात रेल्वे प्रवाशांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि केवळ रील्स किंवा समाज माध्यमावरील प्रसिद्धीसाठी धोकादायक कृत्ये करू नयेत, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
