मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. मात्र, आजही दैनंदिन तिकीट, परतीचे तिकीट किंवा मासिक पासधारकांना कोणतेही स्वतंत्र अपघाती विमा संरक्षण नाही. वाढत्या रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रवाशाला कमी प्रीमियममध्ये अपघाती विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाच्या विचाराधीन असल्याचे समजते.
मराठी एकीकरण समितीने रेल्वे मंडळाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे मंडळाने दिलेल्या उत्तरात हा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. समितीने रेल्वे मंडळाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या केल्या आहेत. त्यामध्ये दैनंदिन आणि परतीच्या तिकिटांसह यूटीएस ॲपद्वारे ऐच्छिक अपघाती विमा उपलब्ध करून देणे, तसेच मासिक, त्रैमासिक, वार्षिक आणि विद्यार्थी पासधारकांसाठी केवळ १० ते २० रुपयांच्या प्रीमियममध्ये अनिवार्य अपघाती विमा लागू करण्याचा समावेश आहे. याशिवाय, विमा योजनेत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व आणि रुग्णालयीन उपचार खर्चाचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेत दरवर्षी रुळ ओलांडणे, धावत्या गाडी लोकलमधून पडणे आणि इतर कारणांमुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आल्याचे मराठी एकीकरण समितीचे प्रतिनिधी आनंदा पाटील यांनी सांगितले.
