मुंबई : मध्य रेल्वेवरील कुर्ला यार्डमधील इएमयू साइडिंग येथे उभ्या असलेल्या एका कचरा वाहून नेणाऱ्या मक स्पेशल रेकला गुरुवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. अग्निशमन पथके ताबडतोब तैनात करण्यात आल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा खोळंबली होती.
कुर्ला आणि विद्याविहारच्या दरम्यान कुर्ला यार्ड असून
कचरा उचलणाऱ्या एका रेल्वेगाडीला मोठी आग लागल्याची घटना रात्री ८.३८ वाजता घडली. आगीचा भडका अधिक असल्याने, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमुळे रेल्वे मार्गाच्या सर्व मार्गिकेचा विद्युत पुरवठा बंद केला होता. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला. अप दिशेने जाणारी लोकल सेवा तात्पुरती बंद केली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न करून ८.५५ वाजता आग आटोक्यात आणली. त्यानंतर लोकल सेवा सुरू केली. रात्रीच्यावेळी लोकल सेवा ठप्प झाल्याने परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रत्येक लोकल स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली होती. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
