scorecardresearch

अर्धवातानुकूलितचा आग्रह!

सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणीचे तीन डबे वातानुकूलित करण्यावर भर

अर्धवातानुकूलितचा आग्रह!

सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणीचे तीन डबे वातानुकूलित करण्यावर भर

मुंबई: वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे अर्धवातानुकूलित लोकल चालवण्याचाही विचार पुन्हा पुढे येत आहे. वातानुकूलित लोकलमुळे सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही. शिवाय प्रवासी संख्याही कमी होते. त्यामुळे सामान्य लोकलमधील बारा डब्यांपैकी तीन किंवा सहा डबेच वातानुकूलित करून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी दिली. यात प्रथम श्रेणीचे तीन डबे मात्र वातानुकूलित करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्याचाही पर्याय समोर आला. कंसल यांनी याविषयी माहिती देताना सध्या धावत असलेल्या १२ डबा सामान्य लोकलमधील तीन डबे प्रथम श्रेणीचे, तर १५ डबा लोकलमध्ये पाच ते सहा डबे प्रथम श्रेणीचे आहेत. उर्वरित डबे द्वितीय श्रेणी, मालवाहतूक, दिव्यांगासांठी आहेत. सामान्य लोकलमधून जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करतात आणि ही लोकल प्रवाशांना फायदेशीरही ठरते. तर सध्या एक वातानुकूलित लोकल धावत असून त्याच्या दररोज १२ फेऱ्या होतात. या वातानुकूलित लोकल गाडीला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे  सांगितले. शिवाय प्रवासी क्षमताही कमीच आहे.

वातानुकूलित लोकलगाडीला मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे मध्य व पश्चिम रेल्वेवर नुकतेच एक सर्वेक्षणही करण्यात आले. या सर्वेक्षणातून प्रवाशांनी वातानुकूलित लोकल गाडीविषयी अनेक सूचनाही केल्या. यात १२ डब्यांच्या सामान्य लोकलमध्ये सहा डबे किंवा तीन डबे वातानुकूलित आणि १५ डबा लोकलमध्ये सहा डबे वातानुकूलित ठेवून लोकल चालवणे योग्य आहे का याविषयी प्रवाशांनी सूचनाही केल्या, तर भाडेदरासंदर्भातही मते व्यक्त केली आहे. हा सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाला सादरही केला.

प्रथम श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर

याआधी अर्धवातानुकूलित लोकल चालवण्यासंदर्भात एक तांत्रिक समितीही स्थापन करण्यात आली होती. त्यांच्याकडूनही बरीच पडताळणी केल्यानंतर एक अहवालही रेल्वे बोर्डाला पाठवल्याचे कंसल म्हणाले. वातानुकूलित लोकलपेक्षा १२ डबा सामान्य लोकलमधील फक्त तीन किंवा सहा डबे वातानुकूलित करून आणि १५ डब्यांपैकी पाच ते सहा डबे वातानुकूलित करून ती चालवणे परवडण्यासारखे आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या वातानुकूलित लोकलचा विचार होत आहे. यात सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचे तीन डबे वातानुकूलित करण्यावर विचारविनिमय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

वातानुकूलित लोकल सर्वेक्षणमधील काही मुद्दे

’ मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील ११,७४३ आणि पश्चिम रेल्वेवरील २५,३३९ प्रवाशांची विविध प्रश्नांवर मते व सूचना घेण्यात आली.

’ ९ हजार ९६१ प्रवाशांनी म्हणजेच साधारण ३९ टक्के प्रवाशांनी १२ डबा लोकलमधील तीन डबे वातानुकूलित असावे, असे मत व्यक्त केले.

’ १५ डबा लोकलमध्ये सहा डबे वातानुकूलित असावे, असे मत ६ हजार २१० प्रवाशांनी व्यक्त केले.

’ १२ डबा लोकलमध्येही सहा डबे वातानुकूलित करण्यावर १६ टक्के लोकांनी आणि २० टक्के प्रवाशांनी पूर्ण वातानुकूलित लोकलच असावी, अशी सूचना केली. ५२.९० टक्के प्रवाशांनी प्रवासी भाडेदर कमी करावे, तर ३४ टक्के प्रवाशांनी ‘जैसे थे’च भाडेदर असावे, असे मत व्यक्त केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai local trains to change three first class coaches into ac coaches zws

ताज्या बातम्या