मुंबई : इंधन दरातील वाढीमुळे आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानांची संख्या कमी आहे. त्यातच प्रवाशांना विमानातील तांत्रिक बिघाडाचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई विमानतळावरून बुधवारी सकाळी लंडनला जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. बिघाडामुळे विमानाचे उड्डाण सुमारे चार ते पाच तासांनी झाले.

ब्रिटिश एअरवेजचे विमान बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मुंबई – लंडनदरम्यान उड्डाण करणार होते. प्रवासी विमानात बसल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. तांत्रिक बिघाडामुळे विमानातील वातानुकूलित यंत्रणा कार्यरत नव्हती. विमान धावपट्टीवर उभे असल्याने उन्हामुळे प्रवाशांची काहिली होत होती. त्यातच वातानुकुलित यंत्रणा बंद असल्याने अनेक प्रवाशांना त्रास झाला. शेवटी दुपारी दोनच्या सुमारास विमानातील बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर विमानाने उड्डाण केले. मात्र या विलंबामुळे अनेक प्रवाशांचे पुढील नियोजन कोलमडले. यामुळे प्रवाशांनी विमान कंपन्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.