लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : गटातटांचे सुरू असलेले राजकारण, पक्षांतर्गत चुरस, आगामी निवडणुका या पार्श्वभूमीवर साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवात लहान-मोठ्या सर्वच राजकीय नेते मंडळींनी फलकबाजी करून प्रसिद्धी मिळविण्याचा खटाटोप सुरू केला आहे. उच्च न्यायालयाने राजकीय फलकबाजीला बंदी केलेली असतानाही संपूर्ण मुंबईत गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी राजकीय मंडळींनी फलक झळकवून मुंबई
गणेशोत्सवाला १९ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. तत्पूर्वीच राजकीय नेते मंडळींनी गणेश आगमन मिरवणुकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर्स झळकवले होते. गणेश आगमनानंतर त्याच दिवशी रात्री काही ठिकाणचे बॅनर्स बदलण्यात आले. आगमन सोहळ्याच्या फलकांची जागा दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाच्या फलकांनी घेतली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे संदेश आणि नेते, त्यांच्या समर्थकांची छबी फलकांवर झळकत आहे. केवळ फलकच नाहीत तर रस्त्याच्या मध्यभागी कमानी उभारून नेते मंडळींनी स्वत:ची जाहिरातबाजी केली आहे. यामुळे अवघी मुंबई विद्रुप झाली आहे. दरम्यान, मुंबईत पुन्हा एकदा नेते मंडळींच्या वाढदिवसानिमित्त फलक झळकू लागले आहेत.
आणखी वाचा-शिवसेना ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
उच्च न्यायालयाने राजकीय फलकबाजीला बंदी घातली आहे. त्याचबरोबर जाहिरात फलकांबद्दल धोरण आखण्याचे आदेशही महानगरपालिकेला दिले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मुंबई महानगरपालिकेने कारवाई करून दोन दिवसांमध्ये मुंबई बॅनरमुक्त केली होती. मात्र कालौघात उत्सवांच्या निमित्ताने मुंबईत पुन्हा राजकीय बॅनरबाजीला उत आला आहे. यंदा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त कांदिवली परिसरात मोठ्या प्रमाणावर फलक झळकविण्यात आले होते. या फलकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित व्यक्तींनी मारहाण केली. मारहाण करणाऱ्याविरोधात महानगरपालिकेने पोलिसात तक्रार केली होती. मात्र या घटनेमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
उच्च न्यायालयाने राजकीय बॅनरबाजीवर पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे मुंबईत झळकविण्यात येणाऱ्या राजकीय बॅनरवर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. मात्र कारवाई करण्यास गेलेले अधिकारी – कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात येत आहे. एकीकडे न्यायालयाचे आदेश आणि दुसरीकडे मारहाणीची भिती अशा कात्रीत अधिकारी-कर्मचारी अडकले आहेत, असे मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai looks ugly because of political billboards mumbai print news mrj