मुंबई : गेल्या सहा महिन्यांत मुंबईत सुमारे १८ हजार ५०० रुपये किमतीच्या ९५७ आलिशान घरांची विक्री झाली आहे. गेल्या १२ महिन्यांत सलगपणे १६९९ आलिशान घरांची विक्री झाली आहे. सुमारे २० ते ४० कोटी रुपये किमतीच्या घरांना सर्वाधिक मागणी असल्याचे ‘सीआरई मॅट्रीक्स’ या संशोधन कंपनीने जारी केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रिअल्टी आणि सीआरई मॅट्रीक्स यांनी संयुक्तपणे ‘मुंबई लक्झरी हौसिंग रिपोर्ट २०२६’ प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, आलिशान घरांच्या बाजारातील व्यवहार मूल्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत चांगलीच वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत आलिशान घरांची विक्री होत नसल्याने विकासकांच्या घरांच्या किमती चार ते सहा टक्क्यांनी कमी केल्या होत्या. त्यानंतरही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र यंदा गेल्या १२ महिन्यांत आलिशान घरविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी १६ हजार ५१८ कोटींंच्या आलिशान घरांची विक्री झाली होती. यंदाच्या सहामाहीतच १८ हजार ५१२ कोटींची आलिशान घरांची विक्री झाली आहे. हा आकडा आलिशान घरांनाही मागणी असल्याचे स्पष्ट करतो, असे मत सीआरई मॅट्रीक्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक किरण गुप्ता यांनी व्यक्त केले. यंदा सहा महिन्यांच्या कालावधीत ९५७ आलिशान घरविक्रीचे व्यवहार नोंदविले गेले. गेल्या पाच वर्षांत मुंबईतील आलिशान निवासी घरांची निर्मिती दुपटीने वाढली आहे.
त्यातुलनेत घरांची विक्री होत नव्हती. मात्र मागील १२ महिन्यांत सुमारे १६९९ घरांची विक्री झाली. सलग १२ महिन्यांच्या कालावधीत नोंदविण्यात आलेली ही सर्वाधिक विक्री आहे. या व्यवहारांचे एकत्रित मूल्य सुमारे ३४ हजार कोटींच्या घरात आहे. २० ते ४० कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. या किमतीची गेल्या तीन वर्षांत फक्त ६६ घरे विकली गेली होती. यंदा सहा महिन्यात १५६ घरांची विक्री झाली आहे, असे अहवालात नमूद आहे. दोन हजार ते चार हजार चौरस फुटांच्या आलिशान घरांना खरेदीदारांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. एकूण विक्रीपैकी ५८ टक्के वाटा या घरांचा आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आलिशान घरांच्या विक्रीत दक्षिण मुंबईऐवजी मध्य मुंबईतील घरांना प्राधान्य मिळाले आहे. यंदा सहामाहीत वरळीतील चार हजार ४९३ कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री झाली आहे. याच कालावधीत विक्री झालेल्या घरांची संख्या ३५ वरून १५९ पर्यंत, म्हणजे पाचपट वाढली. या पाठोपाठ लोअर परळमधील घरांना खरेदीदारांनी पसंती दिली. या अहवालानुसार या खरेदीत ३५ ते ५५ वर्षे वयोगटातील खरेदीदारांचा वाटा ५८ टक्के होता तर ६५ वर्षांवरील खरेदादारांचा वाटा १२ टक्के होता, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
