मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – मडगावदरम्यान चार गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वे गाड्यांच्या एकूण चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक ०१००७ विशेष रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११ व १३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.४० वाजता सुटेल व त्याचदिवशी दुपारी ३.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०१००८ विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून ११ व १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
या विशेष रेल्वेगाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि व करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत. या विशेष गाडीमध्ये तृतीय वातानुकूलित श्रेणीचे दोन डबे, १२ शयनयान, ६ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड सिटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन अशी डब्यांची रचना असेल.
आरक्षण सुविधा
गाडी क्रमांक ०१००७ गणपती आरक्षित विशेष रेल्वेगाडीचे आरक्षण २९ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत प्रवासी आरक्षण केंद्रांवर (पीआरएस); तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी नियमित दराने यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट काढता येईल. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी रेलवन ॲपचाही वापर करता येईल. या विशेष रेल्वेगाड्यांच्या विविध स्थानकांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी रेल्वेच्या एनटीइएस प्रणालीचा वा एनटीइएस ॲपचा वापर करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
