मुंबई : प्रेशर पाईपमधील बिघाडामुळे मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी तब्बल तीन तास रखडली. पेण – जितेदरम्यान दीड तास एक्स्प्रेस एकाच ठिकाणी उभी राहिल्यानंतर ती पेण स्थानकात आणण्यात आली. तेथेही सुमारे दीड तास तांत्रिक तपासणी सुरू राहिल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. जनशताब्दीच्या मागील तीन रेल्वेगाड्यांना या बिघाडाचा फटका बसला.

पेण आणि जिते स्थानकांदरम्यान जनशताब्दीच्या प्रेशरपाईपमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एक्स्प्रेस सकाळी ७.१४ वाजता थांबवली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बिघाड दूर करण्याचे काम सुरू केले.

सकाळी ८.४३ वाजता एक्स्प्रेस पुढे रवाना करण्यात आली. त्यानंतर अधिक तपासणीसाठी ती पेण स्थानकात आणण्यात आली. पेण स्थानकात रेल्वेच्या तांत्रिक पथकाने प्रेशर पाईपमधील बिघाडाची तपासणी केली. या कामासाठी सुमारे दीड तास लागला. त्यामुळे जनशताब्दीच्या प्रवासाला मोठा विलंब झाला. नियोजित वेळेत प्रवास करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.

मागील तीन गाड्यांनाही फटका

जनशताब्दी एक्स्प्रेस रखडल्याचा परिणाम मागील रेल्वे सेवांवरही झाला. तिच्या मागे असलेल्या तीन गाड्या एकापाठोपाठ एक थांबवण्यात आल्या. त्यामुळे या एक्स्प्रेसमधील प्रवाशांनाही विलंबाचा सामना करावा लागला. बिघाडामुळे कोकण मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.