मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमधील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे याच्या समन्वयाने अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मुंबई सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वे; तसेच सुरत – मंगळुरू विशेष रेल्वेगाडीला नियमित एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११७३ / ०११७४ सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०११७३ सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वेगाडी ३० मे रोजी शनिवारी मध्यरात्री १२.२५ वाजता मुंबई सीएसएमटी येथून सुटेल आणि रविवारी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०११७४ मडगाव – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी ३० मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजता मडगाव येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत. या विशेष रेल्वेगाडीत एकूण २२ डबे असणार असून त्यामध्ये १६ शयनयान, २ अनारक्षित शयनयान, २ सामान्य आणि २ एसएलआर डब्यांचा समावेश आहे.

सुरत – मंगळुरू विशेष रेल्वेगाडीला नियमित एक्स्प्रेसचा दर्जा

प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक निर्णय घेत रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ सुरत – मंगळुरू विशेष गाडीला नियमित एक्स्प्रेसचा दर्जा दिला. आता ही रेल्वेगाडी १९०५७ / १९०५८ सुरत – मंगळुरू – सुरत द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. गाडी क्रमांक १९०५७ सुरत – मंगळुरू एक्स्प्रेस ३ जूनपासून दर बुधवारी आणि रविवारी सायंकाळी ७.३५ वाजता सुरत येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता मंगळुरू येथे पोहोचेल. तर, गाडी क्रमांक १९०५८ मंगळुरू – सुरत एक्स्प्रेस ४ जूनपासून दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री १०.३० वाजता मंगळुरू येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता सुरत येथे पोहोचेल.

या रेल्वेगाडीला उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बिंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्थानकांवर थांबे असतील. या एक्स्प्रेसमध्ये एकूण २० डबे असणार असून त्यात १ द्वितीय वातानुकूलित, ७ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ४ सामान्य आणि २ एसएलआर डब्यांचा समावेश आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.