मुंबई : रेल्वे रुळांवरून जाणारा पहिला केबल स्टेड उड्डाणपूल मुंबई महानगरपालिका बांधणार आहे. हा पूल पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकाजवळ केशवराव खाडये मार्गावर बांधण्यात येणार आहे. वांद्रे वरळी सी लिंक पुलाप्रमाणे हा केबल आधारित पूल असेल. या पुलाला आधार देण्यासाठी ७८.५ मीटर उंच पायलॉन (मोठा खांब) उभारावा लागणार आहे. या उड्डाणपुलाचे काम दिनांक ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे पूल विभागाचे उद्दिष्ट्य आहे.

महालक्ष्मी येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी विकास नियोजन आराखड्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने दोन नवीन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांमुळे वाहतुकीचे नियमन सुरळीत होणार आहे. त्यापैकी महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील केशवराव खाड्ये मार्गावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. विकास नियोजन आराखड्यानुसार सुरू असलेल्या या उड्डाणपुलाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी नुकतीच पाहणी केली व विविध निर्देश दिले.

केशवराव खाड्ये मार्गावर उभारण्यात येणारा ”केबल स्टेड पूल” हा रेल्वे रूळांवरील महानगरपालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी ८०३ मीटर तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी २३.०१ मीटर इतकी आहे.

या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून केबल – स्टेड पुलास आधार देण्यासाठी ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन (भव्य लोखंडी खांब) उभारण्यात आला आहे. पायलॉनच्या पश्चिमेकडील ९५ मीटर लांबीच्या स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. पूर्वेकडील १६५ मीटर लांबीच्या स्पॅनची उभारणी रेल्वे हद्दीतील जागेत रेल्वे विभागाकडून आवश्यक खंड (ब्लॉक) प्राप्त झाल्यानंतर करण्यात येणार आहे.

पायलॉनच्या पश्चिम दिशेकडील बहुतांश खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. तथापि, वाहतूक वळविण्याच्या (ट्रॅफिक डायव्हर्जन) कामामुळे पाच खांबांची उभारणी अद्याप प्रलंबित आहे. वाहतूक पोलिसांच्या परवानगीनंतर वाहतूक वळविण्यात येईल. या कामी महानगरपालिकेच्यावतीने काँक्रीटचा सेवा रस्ता बांधण्यात येत आहे. विविध उपयोगिता वाहिन्या टाकण्याची कामेही सुरू आहेत.

वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने या सेवा रस्त्यावर वाहतुकीचे अवागमन केले जाईल. एकूणच, काम ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे पूल विभागाचे उद्दिष्ट्य आहे.

नवीन पूलामुळे महालक्ष्मी पूर्वेला केशवराव खाडे मार्ग ते पश्चिमेला (सातरस्ता ते महालक्ष्मी रेसकोर्स) दरम्यान थेट मार्ग उपलब्ध होणार आहे. परिणामी महालक्ष्मी स्थानकावरील सध्याच्या पूलावरील वाहतूक कोंडी कमी होईल व प्रवासाचा वेळ कमी होईल. या नवीन पुलाच्या बांधकामामुळे प्रवासाचा मार्ग अंदाजे २०० मीटरने कमी होईल. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि इंधनाचा खर्चही वाचेल,अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.