मुंबई: महालक्ष्मी रेसकोर्सच्या सुमारे २९७ एकर जागेवर अमेरिका आणि लंडनच्या धर्तीवर सेंट्रल पार्क (मध्यवर्ती उद्यान) उभारण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी काय होणार आहे याची कल्पना आमदारांनाही देण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे सेंट्रल पार्क केवळ धनदांडग्यांसाठीच उभे राहणार असेल तर मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या येथील सर्वसामान्य नागरिकांचे काय. त्यामुळे या सेंट्रल पार्कमध्ये जागतिक खेळांबरोबरच खो-खो, कबड्डी या स्थानिक खेळांनाही स्थान मिळावे. हे संट्रलपार्क सर्वसामान्यांसाठी खुले राहावे, अशी मागणी करीत सर्वपक्षीय सदस्यांनी विधान परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी मुंबई सेंट्रल पार्क प्रकल्पावरून लक्षवेधी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई सेंट्रल पार्कला तब्बल १०२ वास्तुविशारदांनी विरोध केला आहे. असे असताना हा प्रकल्प उभारण्याची घाई प्रशासन का करीत आहे असा सवाल त्यांनी केला. हा प्रकल्प नक्की कसा असणार, कोणत्या सुविधा असणार, या ठिकाणी कोणाला प्रवेश मिळणार, स्थानिकांसाठी किती टक्के प्रवेश आणि संधी मिळणार, सर्वसामान्यांसाठी कोणत्या सुविधा मिळणार अशा प्रश्नांची सरबत्तीच आमदार अॅड. अनिल परब, भाजपचे प्रवीण दरेकर, सतेज पाटील आदींनी सेंट्रल पार्कबाबत केली.
या ठिकाणी होणार्या सुविधांनंतर आंतरराष्ट्रीय खेळ खेळणार की स्थानिक खेळांना प्राधान्य देणार, प्रवेशासाठी पैसे आकारणार का?, या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा केवळ टीव्हीवर पाहण्याची वेळ मुंबईकरांवर येणार नाही ना? प्रवेशाबाबत टक्केवारीचे प्रमाण राहणार का? नक्की कोणते खेळ खेळणार? असे सवाल सदस्यांनी उपस्थित केले. मुंबईची ही मोक्याची जागा कंत्राटदारांच्या घशात घालून व्यावसायिकरण करू नका, अशी जोरदार मागणी यावेळी सदस्यांनी केली. त्याचप्रमाणे कोस्टल रोडच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या जेट्टीचा वापर हेलिपॅडसाठी करण्याच्या निर्णयाचाही सदस्यांनी समाचार घेतला. खासगी संस्थेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्याचा निर्णय का घेण्यात आला? प्रशासनाने आपला महसूल का बुडवला, असे सवालही यावेळी उपस्थित करण्यात आले.
व्यापरीकरण होणार नाही – उदय सामंत
मुंबईच्या रेसकोर्सच्या जागेवर होणारे सेंट्रल पार्क अमेरिकेतील तसेच लंडमधील सेंट्रलपार्कपेक्षा अधिक चांगले असावे. जागतिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट द्यावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे याचा आराखडा तयार करण्यासाठी जागतिकदर्जाचे वास्तुविशारद यावेत अशी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार निवडण्यात आलेल्या वास्तुविशारदाने जो आराखडा दिला तो अंतिमच आहे असे नाही. यासाठी लोकप्रतिनिधींच्याही लेखी सूचना घेतल्या जातील. एकूण ८ लाख ५५ हजार १९८ चौरसमीटर क्षेत्रफळात हे उभे राहणार आहे. १०२ वास्तुविशरदांनी सेंट्रल पार्कवर काही आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्या पत्रावर कोणाचीही सही नाही. हे पत्र निनावी आहे. निविदा प्रक्रिया योग्य प्रकारे राबविण्यासंदर्भातील काळजी सरकारने आणि महापालिकेने घेतली आहे. कोणत्याही जागेचे व्यापारीकरण होणार नाही असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.
