मुंबई : ‘आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील महालक्ष्मी मेट्रो स्थानक, मोनोरेल मार्गिकेतील संत गाडगे महाराज चौक स्थानक आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकांना अखंड जोडणी देणाऱ्या देशातील पहिल्या सरकत्या मार्गाचे अर्थात ट्रॅव्हलेटरचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून हा सरकता मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. हा सरकता मार्ग सेवेत दाखल झाल्यास त्यावरून मोनोरेल, रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
चेंबूर – संत गाडगे महाराज चौक ही देशातील पहिली मोनोरेल मार्गिका सुरुवातीपासून तोट्यात आहे. त्यामुळे या मोनोरेलकडे प्रवाशांना वळविण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून ‘एमएमआरडीए’ अनेक उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणजे सरकता मार्ग. महालक्ष्मी येथील संत गाडगे महाराज चौक स्थानक थेट महालक्ष्मी रेल्वे स्थानक आणि मेट्रो ३ मार्गिकेतील महालक्ष्मी स्थानकाशी जोडण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने ट्रॅव्हलेटर अर्थात सरकता मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला.
मागील काही वर्षांपासून सुमारे २८३ मीटर लांबीच्या सरकत्या मार्गाचे काम ‘एमएमआरडीए’कडून सुरू आहे. हा मार्ग ११ मीटर रुंदीचा असून या मार्गावर १७६ मीटर लांबीचे सहा ट्रॅव्हलेटर्स असतील. दोन प्रवासी उद््वाहक सेवाही या मार्गावर पुरविण्यात येणार आहेत. या मार्गिकेवरून तासाला ४,५०० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
मोनोरेल, मेट्रो आणि रेल्वेला अखंड जोडणी देणाऱ्या देशातील पहिल्या सरकत्या मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती ‘एमएमआरडीए’ने दिली. उर्वरित काम लवकरच पूर्ण करून हा सरकता मार्ग सेवेत दाखल केला जाणार आहे. यासाठी कोणतीही निश्चित तारीख अद्याप ‘एमएमआरडीए’ने निश्चित केलेली नाही. हा सरकता मार्ग सेवेत दाखल झाल्यास रेल्वे, मोनोरेल आणि मेट्रो स्थानकांवर पोहोचण्यासाठीचा कालावधी २० मिनिटांनी कमी होणार आहे. अवघ्या काही मिनिटांत मोनोरेल, रेल्वे आणि मेट्रो स्थानकावर पोहोचता येणार आहे.
दरम्यान, मुंबईतील अत्यंत दाट वस्तीत प्रकल्प उभारताना ‘एमएमआरडीए’समोर अनेक आव्हाने होती. ही आव्हाने यशस्वीपणे पेलून प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असल्याचेही ‘एमएमआरडीए’कडून सांगण्यात आले. प्रकल्पाच्या पायाभरणीपूर्वी १,८०० मिमी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आली. तसेच लगतच्या जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांना कोणताही धक्का न लावता संपूर्ण काम पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पासाठी एकही झाड तोडावे लागले नाही, असे ‘एमएमआरडीए’कडून सांगण्यात आले.
