मुंबई : यंदा राज्यात जून महिन्यात उशिराने दाखल झालेल्या मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सरासरी तारखेच्या दोन दिवस आधीच सुरू झाला असून शनिवारी मोसमी पावसाने मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही भागातून माघार घेतल्याची घोषणा हवामान विभागाने केली. मोसमी पावसाची परतीची रेषा ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि कोकणातील हर्णे येथून जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसात उर्वरित राज्यातून मोसमी पाऊस माघारी फिरण्यास अनुकूल स्थिती आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला होता. याच कालावधीत राज्यात राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून राज्यात वादळी पाऊस प्रभावहीन झाला असून उकाड्यात वाढ झाली आहे. तसेच काही भागातील कमाल तापमानातही वाढ नोंदली जात असून पुढील काही दिवसात उकाड्यात आणखीन वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईसह निम्म्या राज्यतून पावसाने माघार घेतल्याची घोषणा हवामान विभागाने केली. राज्यातून मोसमी पाऊस माघारी फिरण्याचा सरासरी कालावधी ५ ते १० ऑक्टोबर इतका आहे. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण असमान होते. संपूर्ण हंगामात राज्यात आतापर्यंत १९ टक्के इतकी पावसाची तूट असून सप्टेंबर महिन्यातील पावसाची तूट ५२ टक्के इतकी होती.

दरम्यान, राजस्थानमधून सरासरी १७ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होतो. यंदा मात्र, दोन दिवस उशिराने म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला वायव्य राजस्थानातून सुरुवात झाली. सध्या मोसमी पावसाने उत्तर भारताच्या बहुतांश भागांसह संपूर्ण गुजरात आणि मध्य प्रदेश बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही प्रदेशातून माघार घेतली आहे. राज्यातून सरासरी ५ ऑक्टोबरपासून पावसाच्या परतीची प्रक्रिया सुरु होते आणि १० ऑक्टोबरपर्यत राज्यातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जातात. यंदा मात्र दोन दिवस आधीच मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला असून पुढील दोन ते तीन दिवसात संपूर्ण राज्यातून मोसम पाऊस माघारी फिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत आतापर्यंत किती पाऊस ?

मोसमी पावसाच्या हंगामात १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ हजार ९५७ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात २ हजार ५३० मिमी पावसाची नोंद झाली आहे या कालावधीत कुलाबा केंद्रात २ हजार ९०४ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात २ हजार ३१८ मिमी पावसाची नोंद होणे अपेक्षित असते. यंदा कुलाबा येथे ७ टक्के पावसाची तूट असून सांताक्रूझ येथे सरासरीहून ९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, मुंबईतून मोसमी पाऊस ८ ऑक्टोबर रोजी माघार घेतो. मात्र, यंदा पावसाने सरासरी तारखेच्या पाच दिवस आधी माघार घेतली आहे. दरम्यान, मागील २३ वर्षात यंदा मोसमी पाऊस लवकर माघारी गेला आहे. यापूर्वी ३० सप्टेंबर २००२ रोजी पावसाने लवकर माघार घेतली होती तर गेल्यावर्षी १० ओक्टोबर रोजी मुंबईतून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला होता. तसेच २०२४ मध्ये १५ ऑक्टोबर, २०२३ आणि २०२२ मध्ये २३ ऑक्टोबर तर २०२१ मध्ये १४ आक्टोबर रोजी मोसमी पावसाने माघार घेतली होती.