मुंबई : हिरवाई, शांतता आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे अल्पावधीतच मुंबईकरांना भुरळ घातलेला निसर्ग उन्नत मार्ग सध्या ओस पडला आहे. मलबार हिल टेकडी भागात असलेल्या या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता असल्याने गेल्या महिनाभरापासून निसर्ग उन्नत मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ऑगस्ट अखेरपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्याचा महापालिकेचा मानस आहे. तसेच, महापालिकेला आणखी काही दिवस आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

सिंगापूरच्या ”ट्री टॉप वॉक”च्या धर्तीवर महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील मलबार हिल येथे निसर्ग उन्नत मार्ग उभारला. हा संपूर्ण मार्ग लाकडापासून तयार करण्यात आला असून त्याची लांबी एकूण ४८५ मीटर, तर रुंदी २.४ मीटर एवढी आहे. घनदाट झाडीतून जाणाऱ्या या मार्गावर विविध प्रजातींच्या शेकडो वनस्पती, झाडे, निरनिराळे पक्षी, सरपटणारे प्राणी न्याहाळण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक भेट देतात. मार्च २०२५ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ७७ लाख रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे. तसेच, सुमारे सात लाख पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून हा मार्ग बंद असून पर्यटकांकडून आता विचारणा केली जात आहे. कर्णफळ झाडाची भलीमोठी फांदी १२ जून रोजी पडून लाकडी मार्गाचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी तेथे सुमारे ३० -३५ पर्यटक होते. सुदैवाने त्या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर पुढील दोन ते तीन दिवसांत मार्गाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंदच ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. झाड दुर्घटनेमुळे निसर्ग उन्नत मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

महापालिकेच्या अभियंत्यांमार्फत त्यावेळी निसर्ग उन्नत मार्गाची संरचनात्मक तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान उन्नत मार्गावर दरड कोसळण्याचा धोका अभियंत्यांनी वर्तविला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना या मार्गावर तात्पुरती प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत हा मार्ग पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे समजते. दुर्घटनेनंतर फिरोजशाह मेहता उद्यानही काही काळ बंद ठेवण्यात आले होते. पावसाळ्यात टेकडीच्या उतारावरील माती वाहून जाऊ नये किंवा दरड कोसळू नये, यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामे हाती घेतली जातील, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.