मुंबई : भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत देशभरातील १,३०० हून अधिक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास व आधुनिकीकरणाची कामे सुरू असून, पश्चिम रेल्वेवरील १२४ स्थानकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. यापैकी राज्यात १८ स्थानकांवर विविध स्तरांवर विकासकामे सुरू असून पश्चिम रेल्वेवरील १० स्थानकांच्या उन्नतीकरणाला वेग आला आहे.
पश्चिम रेल्वेवरील मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी, मालाड, जोगेश्वरी, पालघर, कांदिवली आणि दहिसर या स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय धरणगाव, अमळनेर आणि नंदुरबार या स्थानकांवरही कामे सुरू आहेत. दरम्यान, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, अंधेरी आणि बोरिवली या पाच महत्त्वाच्या स्थानकांच्या मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांवर नियोजन आणि आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सुधारित करण्यात आला असून त्याचा आढावा रेल लँड डेव्हलपमेंट प्राधिकरणाकडून (आरएलडीए) घेण्यात आला आहे. दादर, वांद्रे टर्मिनस, अंधेरी आणि बोरिवली स्थानकांसाठीही संकल्पनात्मक आराखडे आणि आर्थिक मॉडेलिंगचे काम प्रगतिपथावर आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) पश्चिम रेल्वेवरील सात लोकल स्थानकांच्या सुधारणा प्रकल्पावर काम सुरू असून या प्रकल्पाचा मंजूर खर्च ९४७ कोटी रुपये आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एकूण १७ स्थानकांचा या प्रकल्पात समावेश आहे. या कामाची भौतिक प्रगती सध्या ६६ टक्के झाली असून मार्च २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. खार रोड, कांदिवली आणि मीरा रोड स्थानकांवरील कामे पूर्ण झाली आहेत. तर भाईंदर, नालासोपारा, वसई रोड आणि दादर स्थानकांवरील कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मुंबई विभागातील स्थानकांच्या कामांचा आढावा घेतला असता, मालाड स्थानकाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार आहे. मरीन लाइन्स स्थानकाची ६७ टक्के, पालघरची ६८ टक्के, ग्रॅन्ट रोडची ४० टक्के आणि चर्नी रोडची ३९ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. जोगेश्वरी, लोअर परळ आणि प्रभादेवी स्थानकांवरील कामेही सुरू असून ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत. कांदिवली आणि दहिसर स्थानकांचा नुकताच या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांना आधुनिक सुविधा, सुधारित प्रवेश व्यवस्था, आकर्षक स्थानक इमारती, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अमृत भारत स्थानक योजनेतील स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. या वर्षाअखेरीस तीन स्थानकांत प्रवासीभिमुख सेवा वाढवण्यात येतील. तर, २०२७ मध्ये उर्वरित स्थानकाचे काम पूर्ण होईल. रामाश्रय पाण्डेय, महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे
