मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणूकीचा निकाल लागून पंधरा दिवस झाले असले तरी २२७ प्रभागांपैकी एक प्रभाग असा आहे जिथे मताधिक्याचा आकडाच बाहेर आलेला नाही. मालाड मधील प्रभाग क्रमांक ४३ च्या एका मतदान केंद्रावर कंट्रोल युनिट बिघडल्यामुळे मतमोजणी पूर्ण झालीच नाही. मात्र मतांचा फरक वाढत गेल्यामुळे विजयी उमेदवार घोषित करण्यात आला होता. मात्र या निर्णयावर भाजपच्या पराभूत उमेदवाराने आक्षेप घेतला असून त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली असून १६ जानेवारीला मतमोजणीही झाली. सर्व २२७ प्रभागातील निकाल लागले असून कोण किती मताधिक्याने जिंकले ते देखील स्पष्ट झाले आहे. मात्र पश्चिम उपनगरातील मालाड येथील प्रभाग क्रमांक ४३ हा त्याला अपवाद आहे. या प्रभागात भाजपचे विनोद मिश्रा आणि शिवसेना, मनसे, राष्ट्र्वादी (शरद पवार) युतीचे अजित रावराणे यांच्यात लढत झाली होती. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित रावराणे यांनी विनोद मिश्रा यांचा ४९५ मतांनी पराभव केला. या निवडणूकीत रावराणे यांना ११७६० मते मिळाली तर मिश्रा यांना ११२६५ मते मिळाली होती. मात्र या मतमोजणीला मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे.
मतदानाच्या दिवशी एका कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्यामुळे कंट्रोल युनिट बदलण्यात आले होते. मतमोजणीच्यावेळीही या बिघाड झालेल्या कंट्रोल युनिटमधील मतांची मोजणी होऊ शकली नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार विनोद मिश्रा यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी नामंजूर केली. त्यामुळे मिश्रा यांनी आता या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत मिश्रा यांनी सांगितले की, मतदानाचे यंत्र बिघडल्यानंतर ते यंत्र कधी सुरू होईल याबाबत कोणतीच कल्पना मतदारांना दिली नव्हती. त्यामुळे नवीन युनिट बसवल्यावर अतिशय कमी मतदान या केंद्रावर झाले. त्याचा फटका बसला आहे. मतमोजणी न करताच मतांचा फरक गृहित धरणे याला आपला आक्षेप असल्याचे मत मिश्रा यांनी मांडले आहे.
नक्की प्रकरण काय …
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र क्र. ४४ मध्ये कंट्रोल युनिट बिघडल्यामुळे काही काळ मतदान बंद ठेवावे लागले होते. त्यानंतर नवीन कंट्रोल युनिट जोडण्यात आले. परंतु, मतमोजणीदरम्यान तांत्रिक बिघाड झालेल्या आधीच्या कंट्रोल युनिटमधील मतमोजणी होऊच शकली नाही. अशावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पाचव्या व अंतिम फेरी अखेर टपाली मतदान एकत्रित करून सर्वाधिक मते मिळणाऱ्या उमेदवाराला (अजित बाळकृष्ण रावराणे) विजयी घोषित केले. मतमोजणीच्या अखेरीस प्रथम व द्वितीय उमेदवार यांच्या एकूण मतांमधील फरक हा ४९५ झाला होता. बिघाड झालेल्या कंट्रोल युनिटमध्ये केवळ २८२ जणांचे मतदान झाले होते. मतांमधील फरक हा २८२ पेक्षा जास्त असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला.

