मुंबई : हिवतापाच्या निर्मूलनासाठी तापाच्या रुग्णांची तपासणी करण्याकरीता मुंबई महानगरपालिकेला दिलेले लक्ष्य मागील १० वर्षांमध्ये २०२५ मध्ये प्रथमच पूर्ण करणे शक्य झाले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत हिवतापासाठी रक्तनमूने तपासण्याचे मुंबई महानगरपालिकेला १२ टक्क्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे. गतवर्षी १२ टक्क्यांचा टप्पा ओलांडत मुंबई महानगरपालिकेने १४.५ टक्क्यांचा टप्पा गाठला. मात्र तपासण्यांचे प्रमाण वाढले असतानाच हिवतापाची लागण दर्शविणाऱ्या निर्देशांकांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे हिवतापाच्या नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अधिक सक्षमपणे अमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
मुंबईच्या ‘लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हिवतापासाठी रक्तनमूने तपासण्या’साठी (एबीईआर) मुंबई महानगरपालिकेला १२ टक्क्यांचे उद्दिष्ट केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. मागील १० वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून तपासणी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असली तरी त्यांना १२ टक्क्यांचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश येत होते. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हिवतापासाठी रक्तनमूने तपासण्याचे प्रमाण २०२५ मध्ये प्रथमच ओलांडण्यात यश आले आहे. २०२५ मध्ये मुंबई महानगरपालिकेने १८ लाख ८९ हजार १२ हिवतापाच्या तपासण्या केल्या.
हे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत १४.५ टक्के इतके आहे. तपासणी केलेल्या रुग्णांपैकी १० हजार १६३ रुग्णांना हिवतापाची लागण असल्याचे स्पष्ट झाले. हिवतापाला प्रतिबंध करण्यासाठी लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्या करण्याचे लक्ष्य गाठण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले असले तरी हिवताप रुग्ण बाधित दराचे प्रमाण मागील तीन वर्षांमध्ये ०.५ टक्के इतके कायम आहे. त्यामुळे हिवतापाच्या नियंत्रणांसाठी सातत्याने प्रयत्न होत असतानाही रुग्ण बाधितांच्या निर्देशांकात अपेक्षित घट झालेली नाही. त्यामुळे हिवतापावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला अपयश आल्याचे निदर्शनास येत आहे.
एबीईआर हा वार्षिक निर्देशांक असल्याने वर्षभरातील तपासण्यांच्या आधारे त्याचे अंतिम चित्र स्पष्ट होते. त्यामुळे २०२६ मध्येही मोठ्या प्रमाणात रक्तनमुना तपासण्या सुरू ठेवून किमान १२ टक्क्यांचा टप्पा गाठण्याचे तसेच रुग्ण बाधितांच्या निर्देशांकात घट करणे असे दुहेरी आव्हान यंदा मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर असणार आहे.
वर्ष
चाचण्या —बाधित रुग्ण २०१५ — १४२८२६५ — ७५१७ २०१६ — १५२९८७५ —५८४५ २०१७ — १३८९४४० — ६०१९—२०१८ — १३७६१८५ — ५०५१ २०१९ — १४०५७५८ — ४३५७ २०२० — ८८२७७१ — ५०१५ २०२१ — ११९९३८५ — ५१७२ २०२२ — १३६७०१२ — ३९८५ २०२३ — १३९८१९५ — ७३१९ २०२४ — १५१६६५५ — ८७१० २०२५ —१८८९०१२ —१०१६३ २०२६ — ७६१४३९ — ३३९४
