Mumbai Wife Murder Extramarital Affair: विवाहबाह्य संबंधातून स्वतःच्या पत्नीच्या खुनाचा कट रचणाऱ्या मुंबईतील एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे वाटले होते. मात्र सखोल तपास केल्यानंतर आता दीड वर्षानंतर या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले आहे. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी गीता चौधरी (वय ३४) नामक महिला घरातील किचनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. या प्रकरणात आता तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून नोंदवले होते. अपघाती निधनाचा अहवाल (ADR) सादर करण्यात आला होता. मात्र त्यावेळी शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नव्हते. तसेच शवविच्छेदनानंतर गीता यांचे पार्थिव राजस्थानमध्ये अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आले, अशी बातमी एनडीटीव्हीने दिली.
मात्र गीता यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबियांना संशय येत होता. आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा गीता यांचे वडील भानाराम चौधरी यांनी केला. मुलीच्या मृत्यूमागे काहीतरी काळेबेरे असावे, असा ठाम विश्वास असल्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाची सुनावणी सुरू केली.
चौकशीअंती पोलिसांना समजले की, गीता यांचा पती सखाराम याने दोन वेळा गीताला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी पत्नीचा खून करण्याची सुपारी दिली.
पहिले दोन प्रयत्न कधी झाले?
पहिल्या प्रयत्नात पवई येथे पत्नीला रस्ते अपघातात मारण्याचा कट रचला गेला होता. तर दुसऱ्या प्रयत्नात पत्नीला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही प्रयत्नात अपयश आल्यानंतर पतीने त्याचा मित्र शंकर डांगीशी संपर्क साधला. शंकरबरोबर बाबू आणि दिनेश गायरी असे दोन साथीदारही होते. पत्नीचा खून करण्यासाठी या लोकांना ६.७ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली.
प्रेमसंबंधातून पत्नीचा खून
१४ ऑक्टोबर रोजी गीताचा गळा दाबून खून करण्यात आला आणि ही हत्या आत्महत्या असल्याचा बनाव रचला. गीताचे पती सखारामची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र आपला गुन्हा कबूल केला.
सखारामने पोलिसांना माहिती दिली की, त्याचे डिंपल चौधरी नामक महिलेशी प्रेमसंबंध आहेत आणि त्याला तिच्याबरोबर राहायचे आहे. यात गीताचा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे तिला बाजूला सारण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी सखाराम, शंकर डांगी, बाबू आणि दिनेश या चारही आरोपींना अटक केली आहे.
