मुंबई : पदपथावर झोपलेल्या दोघांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्यांची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सुरेश शंकर गौडा (४०) याला अटक केली आहे. या हत्या १५ मिनिटांच्या कालावधीत आणि दीड किलोमिटरच्या परिसरात झाल्या होत्या. 

भायखळा पूर्वेकडील फ्रुट मार्केटच्या पदपथावर झोपलेल्या एका व्यक्तीची शनिवारी सायंकाळी हत्या करण्यात आली होती. पुढे सर जे. जे. मार्ग परिसरात अशाच प्रकारे पदपथावर झोपलेल्या आणखी एकाची पेव्हर ब्लॉकने हत्या करण्यात आली होती. भायखळा आणि सर जे. जे. मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून  तपास सुरू  केला होता. याच दरम्यान, भायखळा येथे लोकलने उतरलेली व्यक्ती या मार्गाने चालत येताना हत्या करत असल्याचे चित्रीकरण सर जे. जे. मार्ग पोलिसांच्या हाती लागले होते. पोलिसांनी पायधुनी, मोहम्मद अली रोड परिसर पिंजून काढत येथील पदपथावर वास्तव्य करत असलेल्या गौडा याला ताब्यात घेतले. हत्या केलेल्या दोघांनाही ओळखत नसून त्यांना विनाकारण मारले असल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. गौडाने २०१५ मध्ये कुर्ला येथे पदपथावर झोपलेल्या व्यक्तीची अशाच प्रकारेच दगडाने ठेचून हत्या केली. मात्र सबळ पुराव्यांअभावी २०१६ मध्ये तो तुरुंगाबाहेर आला. सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गौडा याला   अटक केली आहे.  दरम्यान, २०१६ नंतर मुंबईत घडलेल्या आणि उकल न झालेल्या अशा सर्वच हत्यांचा पुन्हा तपास करण्यात येणार आहे.