मुंबईत एका ४५ वर्षीय इसमाने एका पाळीव कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली. मुंबईतल्या मालाड पश्चिम भागात ही घटना घडली. २६ एप्रिलच्या दिवशी रुखसाना शेख नावाच्या महिलेने तिचं पेट क्लिनिक सोडलं आणि ती बाहेर आली. तेव्हा तिने घडलेला प्रकार पाहिला जे पाहून तिला धक्का बसला. ज्यानंतर तिने या प्रकरणात आवाज उठवला आणि या माणसाविरोधात तक्रार दाखल केली.

शॅडो नावाच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

रुखसाना ही एका पेट क्लिनिकमध्ये काम करते. तिने जेव्हा तिच्या क्लिनिकबाहेर एका माणसाला कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करताना पाहिलं तेव्हा ती त्याच्यावर ओरडली. कुत्र्याला आधी सोड असं तिने सांगितलं. ज्यावर तो इसम तिच्यावरच ओरडला आणि तिला सांगितलं की हे काय तुझ्या मालकीचं कुत्रं नाही. ज्यानंतर रुखसानाने हेल्पलाइनला फोन केला आणि ते लोक तिथे आले. त्यांनी नरेश चांदूलकर नावाच्या या माणसाला अटक केली. मुक्या जनावरांवर अत्याचार प्रतिबंधक कायदा १९६० अन्वये त्या इसमाला अटक करण्यात आली. शॅडो नावाच्या कुत्र्यावर या नरेश चांदूलकरने अत्याचार केले. शॅडो या कुत्र्यावर उपचार करण्यात येत आहेत. शॅडो हा मालाड पश्चिम भागात असलेल्या डेअरी मालकाचा कुत्रा आहे अशी माहितीही समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

भारतात अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत का?

  • PETA या मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार जुलै २०२४ पासून अशा ४० घटना समोर आला आहे.
  • या घटनांमध्ये गायी, कुत्रे, बकऱ्या, घोडे यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनांचा समावेश आहेत.
  • मुंबईत जानेवारी २०२६ मध्ये २० वर्षांच्या एका तरुणाने कांदिवली या ठिकाणी कुत्रीवर लैंगिक अत्याचार केले होते.
  • तसंच एका ४० वर्षीय माणासाने कांदिवली या ठिकाणी एका कुत्रीवर अत्याचार केले होते अशीही घटना समोर आली होती.
  • याच घटनांप्रमाणे हैदराबाद, कोलकाता, भुवनेश्वर, कोईंबतूर या ठिकाणीही अशा घटना घडल्या आहेत अशी माहिती पेटाने दिली आहे.

अशी विकृत कृत्यं लोक का करतात?

Psychology Today मध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार जे लोक अशा प्रकारे प्राण्यांवर लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार करतात, त्यांना असं काहीतरी करण्याबाबत थ्रील असतं. शिवाय विशिष्ट प्राण्यांबाबतच ते असं कृत्य करतात. अभ्यासकांनी असंही म्हटलं आहे की अनेक लोक पॉर्न पाहतात, त्यावरुन त्यांच्या मनात प्राण्यांचा लैंगिक छळ करण्याची विकृत इच्छा निर्माण होते. अशा गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या गुन्हेगारांपैकी एक तृतीयांश लोकांनी पॉर्न पाहून हे केल्याचं म्हटलं होतं.अशा विकृतांनी लहान मुलांवर तसंच प्राण्यांवर अत्याचार केले होते.

प्राण्यांवरच्या अत्याचारांबाबत भारतीय कायदा काय सांगतो?

भारतीय दंड संहिता कलम ३७७ हे प्राण्यांवरील अत्याचार, लैंगिक छळ याबाबत वापरले जात होतं.

या कलमांनुसार आरोपी दोषी ठरल्यास १० वर्षे तुरुंगवास किंवा जन्मठेप अशा शिक्षांची तरतूद होती.

१ जुलै २०१४ रोजी भारतीय न्यायसंहिता लागू झाली आहे. त्यात ३७७ कलम रद्द करण्यात आलं आहे. शिवाय त्याऐवजी जे कलम आहे त्यात प्राण्यांवरच्या लैंगिक अत्याचारांबाबत शिक्षेची तरतूद स्पष्ट करण्यात आलेली नाही.

भारतीय न्याय संहितेत कलम ३२५ आहे. हे कलम प्राण्यांना इजा पोहचवणं किंवा त्यांचा लैंगिक छळ करणं याच्याशी संबंधित आहे. पोलीस या कलमाचा आधार घेऊन PCA अंतर्गत कारवाई करु शकतात.
पहिल्यांदा असा गुन्हा करण्यासाठी ५० रुपये दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि प्राणीमित्रांनी ही तरतूद म्हणजे प्राण्यांचा लैंगिक छळ करण्याचा किंवा त्यांना मारहाण करण्याचा परवाना आहे का असा प्रश्न विचारला आहे.

कायद्यात सुधारणेसाठी प्रयत्न सुरु आहेत का?

या कायद्यात सुधारणेसाठीचे प्रयत्न सुरु आहेत का? तर याचं उत्तर हो असं आहे. याबाबतची गती मंदावलेली आहे. पण फेडरेशन ऑफ इंडियन अॅनिमल ऑर्गनायझेशन यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. प्राण्यांवरील क्रूर अत्याचार, लैंगिक अत्याचार याबाबत प्रतिबंधक कायदा सुधारणा विधेयक प्रलंबित आहे. यामध्ये प्रस्तावित कलम १३ अ चा समावेश आहे. ज्यामध्ये पशूंवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लोकांना १० वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा जन्मठेप अशी तरतूद या प्रस्तावित विधेयकात आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२४ आणि मे २०२५ मध्ये कारवाईचे निर्देश सरकारला दिले आहेत. दरम्यान या कायद्यात सुधारणा झालेली नाही.