मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने ५५ वर्षीय अस्लम शेख या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबईत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. या निष्काळजीपणाला थेट मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार असल्याचा आरोप करत उपमहापौर संजय घाडी यांनी त्यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे.

४ तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर

साकीनाका येथील खैरानी रोडवर गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. एका खाजगी कंत्राटदाराकडून देखभालीचे काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. परंतु, तिथे कोणतीही सुरक्षात्मक यंत्रणा किंवा रस्ता रोधक (बॅरिकेड्स) लावण्यात आले नव्हते. मुसळधार पावसामुळे अस्लम शेख यांना उघड्या मॅनहोलचा अंदाज आला नाही आणि त्यांचा तोल जाऊन ते २५ फूट खोल मॅनहोलमध्ये कोसळले.

घटनेची माहिती मिळताच पालिका अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा वेग जास्त असल्याने शेख वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात होती; शोध मोहिमेदरम्यान त्यांची छत्री आणि चप्पलही सापडली. अखेर सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना शेख यांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

मी आधीच पत्र दिलं होतं, पण… : उपमहापौर संजय घाडी

या दुर्घटनेनंतर उपमहापौर संजय घाडी यांनी पालिका प्रशासनावर घणाघाती आरोप केले आहेत. घाडी म्हणाले, “चार-पाच दिवसांपूर्वीच मी आयुक्त मॅडमना आणि प्रेसला पुराव्यासकट पत्र दिलं होतं. वॉर्ड स्तरावर मॅनहोल्ससाठी काढलेल्या कॉन्ट्रॅक्टची मुदत संपलेली आहे आणि तिथे संरक्षित जाळ्या लावल्या गेलेल्या नाहीत, याकडे मी लक्ष वेधलं होतं. आपण याची चौकशी करून आदेश द्यावेत अशी मागणी मी केली होती. पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही.”

या निष्काळजीपणासाठी थेट महापालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करत घाडी यांनी शिवसेना या मुद्द्यावर आक्रमक असल्याचा इशारा दिला आहे.

९६ हजार मॅनहोल्सवर जाळ्या, तरीही निष्काळजीपणा : आयुक्त अश्विनी भिडे

दुसरीकडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून शेख यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना जाहीर केल्या आहेत. त्या म्हणाल्या:

  • मुंबईत एकूण १ लाखाहून अधिक मॅनहोल्स असून त्यापैकी जवळपास ९६ हजार मॅनहोल्सवर सुरक्षेच्या कारणास्तव जाळ्या बसवलेल्या आहेत.
  • सध्या विविध कामांसाठी ४ हजार मॅनहोल्सच्या जाळ्या काढण्यात आल्या आहेत.
  • ज्या ‘एल’ वॉर्डमध्ये ही घटना घडली, तिथे एकूण ७५ पैकी ४ मॅनहोल्सच्या जाळ्या कामासाठी काढल्या होत्या, त्यातल्याच एका मॅनहोलमध्ये ही दुर्घटना घडली.

मुंबईकरांमध्ये तीव्र संताप

मॅनहोल उघडे असतानाही साधी बॅरिकेड्स न लावण्याच्या कंत्राटदार आणि पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल्याने आता दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.