मुंबई: मानखुर्द परिसरात रविवारी रात्री एक तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी सोमवारी संबंधित कंत्राटदार, पालिका अधिकारी आणि घर मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे.

मानखुर्दच्या जनता नगर परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक तीन मजली इमारत अचानक शेजारील घरांवर कोसळले. या घराच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले होते. पालिका आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या ढिगाऱ्याखालून सात जणांना बाहेर काढून त्यांना तत्काळ गोवंडीच्या शताब्दी आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी यातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या परिसरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. अनेक भागात तीन ते चार मजल्याची बांधकामे केली जात असून त्याकडे पालिका अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच रविवार रात्री ही घटना घडल्याचा आरोपही यावेळी नागरिकांनी केला आहे. याबाबत सोमवारी मानखुर्द पोलिसांनी संबंधित कंत्राटदार घरमालक, पालिका अधिकारी अशा सात जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी अब्दुल वाहिद आणि गुलाम रजा सय्यद या दोन कंत्राटदारांना अटक केली आहे.