मुंबई : घराच्या भिंतीला तडे गेल्याने दिवसभर घराबाहेर थांबल्यानंतर रात्री मुलांसाठी खिचडी करण्यासाठी अख्तर जहाँ मोइनुद्दीन शाह या आपल्या चार मुलांना घेऊन घरात गेल्या. तर मोईनुद्दीन हे मुलांना खिचडीबरोबर खाण्यासाठी आणखी काही आणायला दुकानात गेले. मात्र त्याचदरम्यान शेजारील तीन मजली इमारत कोसळली आणि मोईनुद्दीन यांच्या संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला.

मेहर अली यांच्या चार वर्षाच्या मुलाने घराला तडे गेल्याचे दाखवल्यानंतर तीन मजली घरासह त्याच्या आसपासची घरे लोकांनी स्वत: रिकामी केली. एका कंत्राटदाराकडे सुपरवायझरचे काम करत असलेल्या मोईनुद्दीन यांनी त्याच परिसरामध्ये दुसरे घर भाड्याने घेण्यासाठी बघितले. त्या घराचा ताबा त्यांना सोमवारी मिळणार होता. त्यामुळे त्यांनी तेथीलच एका घरात दिवसभर मुक्काम केला होता. पावसामुळे दिवसभर जवळपासच्या घरात राहिल्यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांच्या मुलांना भूक लागल्याने त्यांची पत्नी अख्तर जहाँ मोइनद्दीन शाह (३५) या खिचडी रांधण्यासाठी घरात गेल्या, तर मोईनुद्दीन यांनी मुलांना बाहेरून काहीतरी खायाला आणावे यासाठी दुकानात गेले. त्यावेळी अख्तर जहाँ यांच्यासह कैसर जहाँ (१४), मुनाफ (७), जलाउद्दीन (६), अनाबिया (३) ही मुलेही घरी गेली.

शेजारच्या घरातून खेळण्यासाठी ६ वर्षांची आलिया अल्लाउद्दीन शेख ही सुद्धा त्यांच्यासह गेली. अख्तर जहाँ या घरात खिचडी करत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि त्यांचे संपूर्ण घर ढिगाऱ्याखाली सापडल्याची माहिती मोईनुद्दीन शाह यांनी दिली. आपले संपूर्ण कुटुंब निखळलेल्या घराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले बघून मोईनउद्दीन यांना धक्का बसला. माझी मुले मला परत करा असा त्यांचा टाहो मदतकार्य करणाऱयांनाही सुन्न करून गेला. कुटुंबात आता मोईनउद्दीन हे एकटेच वाचले आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन ढिगाऱयाखाली अडकलेल्या मोईनुद्दीन यांच्या कुटुंबियांना बाहेर काढण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दुर्घटनेमध्ये या सर्वांना प्राण गमवावे लागले. दरम्यान दुर्घटना घडल्यानंतरही तब्बल दीड तास मुंबई महानगरपालिका, पोलिस व अग्निशमन दलाचे जवान पोहचले नसल्याबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला.