मुंबई : दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबाने त्रस्त असलेल्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील पाणीपुरवठ्याचे पाणी पिणे टाळावे. त्याऐवजी बाटलीबंद किंवा इतर सुरक्षित पाणी पिण्यासाठी वापरण्याच्या सूचना मंत्रालय प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयातील सर्व टाक्यांमधील पाणी उपसण्यात येत आहे. तसेच पाण्याचे नमुने पालिकेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कार्यालयातील पाणीपुरवठ्याचे पाणी पिणे टाळावे, अशी सूचना केली जात आहे.
गेल्या तीन दिवसांत पोटदुखी, जुलाब, उलट्या आणि तापाच्या तक्रारी कर्मचारी करत आहेत. मंत्रालयाला मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी जमिनीखालील टाक्यांमध्ये साठवले जाते आणि तिथून सर्व कार्यालयांना वितरित केले जाते. पालिकेच्या नियमांनुसार या टाक्यांची दर सहा महिन्यांनी साफसफाई केली जाते आणि शेवटची साफसफाई एप्रिल, २०२६ मध्ये करण्यात आली होती.
टाक्या उपसल्या, वॉटर फिल्टर्सची साफसफाई
शुक्रवारी जमिनीखालील चारपैकी दोन टाक्यांमधील पाणी काढून टाकण्यात आले आहे आणि उर्वरित दोन टाक्यांमधील पाणी रात्री काढून टाकले जाईल. इमारतीच्या छतावरील टाक्यांमध्ये सध्या असलेले पाणी शनिवारी काढून टाकले जाईल आणि त्यानंतर त्या सर्व टाक्यांची साफसफाई केली जाईल. याव्यतिरिक्त, कूलर्सना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सर्व ३३ वॉटर फिल्टर्सची साफसफाई आणि सर्व्हिसिंग करण्यात आले आहे.
पाण्याचे नमुने तपासणीला पाण्याचे नमुने तपासणीसाठी पालिकेकडे पाठवण्यात आले आहेत आणि शनिवारी सकाळी तपासणीचे अहवाल मिळण्याची अपेक्षा आहे. तपासणीचे अहवाल मिळेपर्यंत आणि साफसफाईची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यालयातील पाणी न पिण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.
दवाखान्यात गर्दी
उलट्या, जुलाबाने त्रस्त अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंत्रालयातील दवाखान्यात गर्दी केली होती. गुरूवारी विधिमंडळ सदस्यांकडूनही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेण्यात आली. भाजपचे नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) मनिषा कायंदे यांनी विधीमंडळ अधिवेशनात यावर आवाज उठवला होता. मंत्रालयासारख्या राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय कार्यालयात दूषित आणि निकृष्ट दर्जाच्या पाण्याचा पुरवठा होत असेल तर ही गंभीर बाब आहे. यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कायंदे यांनी केली.
नमुने बाटलीबंद पाण्याचे?
दोन महिन्यांपूर्वी याच समस्येने कर्मचारी त्रस्त झाले होते. त्यावेळी पाण्याचे नमुने तपासणीकरिता दिले गेले. मात्र त्यात काही आढळून आले नाही.
मंत्रालयात अधिकाऱ्यांकरिता बाटलीबंद पाण्याची सोय केली जाते. परंतु, कर्मचाऱ्यांना टाकीतून पुरविले जाणारे पाणी पिण्याशिवाय गत्यंतर नसते. काहींचा तर तपासणीकरिता बाटलीबंद पाण्याचे नमुने दिल्याचा संशय आहे.
