मुंबई: मंत्रालयाच्या परिसरातच पाच मजली नवीन इमारतीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असून ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. मंत्री दालनांचे वाटप झाल्यानंतरही कामाला गती मिळत नसल्याने कंत्राटदाराल प्रतिदिन २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाईपोटी त्याच्या देयकातून १ कोटी २० लाख रुपये कापूनही घेतले आहेत.
मंत्रालयात सर्व मंत्र्यांच्या कार्यालयासाठी तसेच विभागीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडत असल्याने एअर इंडिया इमारत ताब्यात घेण्याआधीच मंत्रालय परिसरात संपूर्णत: पोलादी खांबांवर नवीन इमारत उभी करण्यात येत आहे. महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात या इामरतीचाही समावेश होता. मात्र सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आली तरी ही इमारत मात्र पूर्ण झालेली नाही.
मधल्या काळात या इमारतीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या दालने कितव्या मजल्यावर असतील याची यादीही प्रसिद्ध झाली, पण इमारतीचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. या इमारतीसाठी ११० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र मुदत संपूनही इमारतीचे काम अद्याप सुरू आहे. पुण्यातील शुभम बिल्डर या कंपनीकडून ही इमारत उभारणीचे काम सुरू आहे.
ऑक्टोबर अखेर काम पूर्ण होणार
सततच्या विलंबामुळे कंत्राटदाराला दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ जुलै २०२६ ते १५ जुलै २०२६ या १५ दिवसात प्रतिदिन १० लाख रुपयांचा दंड आकाराला. तर १६ जुलै २०२६ पासून दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके यांनी दिली. आता ऑक्टोबर अखेरपर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
आराखडा बदलल्याने विलंब
इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा परवानग्या मिळण्यास विलंब झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध परवानग्या, सल्लागारांचे अभिप्राय, आयआयटीची इमारत संरचनात्मक आदी परवानग्यांचा त्यात समावेश होता. त्यात या ठाकाणी असलेल्या बेस्टचे विद्युत उपकेंद्राचे स्थलांतरही करावे लागले. सुरुवातीला इमारतीचा आराखडा ‘तळमजला अधिक सात मजले ‘ असा होता. मात्र, नंतर हा आरखडाही बदलून तो ‘तळ मजला अधिक पाच मजले’ असा करण्यात आला. यामुळे प्रत्येक टप्प्यावर इमारतीच्या बांधकामाला विलंब झाल्याची माहिती शुभम विकासकांचे प्रकल्प व्यवस्थापक हंसराज सिंग यांनी दिली.
‘इमारत बांधकामाच्या विलंबापोटी दंड आकारण्याबाबत बजावलेल्या नोटिशीला आम्ही उत्तर दिले आहे. आमच्यावरील दंडात्मक कारवाई आम्हाला मान्य नाही. दंड कोणत्या पद्धतीने आकाराला याबाबत आम्ही विभागाशी पत्रव्यवहार केला आहे’ – हंसराज सिंग, प्रकल्प व्यवस्थापक
