मुंबई : शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी उजव्या विचाराशी संबंधित तरुणांनी मंत्रालयाच्या शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. सुमारे दीडशे तरुण- तरुणींनी तासभर अभिजित दीपके आणि सीजेपीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
क्रॉकेच जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात शिवाजी पार्कवर आंदोलन सुरू असताना, सीजेपीच्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी उजव्या विचाराशी संबंधित काही तरुणांनी मंत्रालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आंदोलन केले.
सुमारे दीडशे तरुण- तरुणींनी अभिजित दिपके आणि सीजेपीच्या विरोधात घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास आंदोलन केल्यानंतर आंदोलक उच्च न्यायालयाच्या दिशेने निघून गेले. आंदोलकांनी आणलेले फलक रस्त्याच्या एका बाजूला टाकले. आंदोलन संपले, असे चित्र निर्माण झाले असतानाच, निघून गेलेले तरूण पुन्हा आंदोलनस्थळी येऊन बसले. आंदोलन सुरू असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. चौकात वाहतुकीला अडथळा होऊ नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली.
आंदोलन नेमकं कुणी केले ?
आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना तुमची संघटना कोणती, असे विचारले असता त्यांनी कोणत्याही संघटनेचे नाव सांगितले नाही. अभिजित दिपके आणि सीजेपी चोर आहे, त्यांचे आंदोलन देश विरोधी आहे. भारतीय राज्यघटनेच्या बाबत तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. तरुणांना सरकारविरोधात भडकविले जात आहे, त्यामुळे सीजेपी विरोधात आंदोलन करीत आहोत, अशी माहिती आंदोलकांनी दिली. आंदोलकांमध्ये उत्तर भारतीय आणि मुस्लिम तरुणांची संख्या जास्त होती.
आंदोलकांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त
सीजेपी विरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर मंत्रालयाची आंदोलनाच्या बाजूकडील दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आली होती. नवीन प्रशाकीय इमारतीचेही प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. मंत्रालय परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलिस फौजफाटा सतर्क झाला होता. त्यामुळे आंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या जास्त दिसत होती.
