मुंबई : शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या दादरच्या ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या रविवारी पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत, विद्यमान सत्ताधारी ‘प्रगती गटा’ने पुन्हा वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संस्थेच्या नायगाव, आकुर्ली-कांदिवली आणि मध्यवर्ती अशा तीन शाखांमधील सर्वसाधारण सभा सदस्यपदांच्या १२ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. मध्यवर्ती शाखेतून संजीव भागवत, राजेंद्र कोरडे आणि दिनेश राणे विजयी झाले. नायगाव शाखेतून सुरेंद्र करंबे, संदेश कदम, मकरंद केसकर, अमेय कोंडविलकर, रवींद्र गावडे, जयवंत गोलतकर, सुरेखा भोसले आणि नेहा राणे विजयी झाले. आकुर्ली शाखेमधून प्रदीप झोरे निवडून आले आहेत.
या संस्थेत सर्वसाधारण सभा सदस्यांच्या एकूण ४० जागा आहेत. त्यापैकी २८ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. प्रगती गटाने या निवडणुकीत पुन्हा वर्चस्व राखले असून, ‘मराठी साहित्य संवर्धन गटा’ला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या ४० सदस्यांमधून लवकरच कार्यकारिणी निवडली जाणार आहे. किरण सोनवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ३ एप्रिल रोजी अध्यक्ष व ७ उपाध्यक्षांची निवड होईल.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी सध्या प्रभाकर नारकर, विद्या चव्हाण, भालचंद्र मुणगेकर आणि शशी प्रभू आहेत; तर विश्वस्त म्हणून सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि प्रताप आसबे कार्यरत आहेत. राज्यातील अनेक साहित्य व संशोधन संस्था सत्ताधारी गटाच्या ताब्यात जात असताना, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मात्र अद्याप विरोधी पक्षाच्या गटाच्या ताब्यात आहे, हे विशेष.
पवारांची निवड बिनविरोध होणार?
संस्थेचे अध्यक्ष शरद पवार प्रकृतीच्या कारणास्तव रविवारी मतदान करू शकले नाहीत. शरद पवार हे १९९२ पासून संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत. आजवर त्यांच्या विरोधात सहसा उमेदवार दिला गेलेला नाही. २०२१ मध्ये ‘आम आदमी पार्टी’च्या धनंजय शिंदे यांनी त्यांना आव्हान दिले होते; तेव्हा २९ विरुद्ध २ मतांनी पवार विजयी झाले होते. यावेळी मात्र त्यांना कोणी आव्हान देण्याची शक्यता कमी आहे.
शरद पवारच अध्यक्ष का हवेत?
निवडून आलेल्या प्रगती गटाला शरद पवार हेच पुन्हा अध्यक्ष म्हणून हवे आहेत. संस्थेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारदरबारी वजन असणाऱ्या व्यक्तीची गरज असल्याचे या गटाचे मत आहे. त्यामुळे ३ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडीत शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव कार्यकारिणीसमोर येईल, असे समजते.
