नोकरी-व्यवसायाच्या शोधात परप्रांतीय मंडळी मुंबईत डेरेदाखल होत आहेत. तशी जैन समाजातील मंडळीही मुंबईत आली आणि येत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी मुंबईत आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. इतकेच नव्हे तर आपली संस्कृती, परंपराही ते मुंबईत जोपासत आहेत. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये या समाजाचे वर्चस्व वाढू लागले आहे. राजकीय छत्रछायेमुळे अनेक भागांत त्यांच्या मतपेढ्या निर्माण झाल्या आहेत. यातूनच आता मराठी विरुद्ध जैन समाज असा संघर्ष टिपेला पोहोचला आहे.
रोजगाराच्या शोधात परप्रांतातून मुंबईत तरुणांचे जथेच्या जथे येत आहेत. परंतु ही बाब मुंबई आणि मुंबईकरांसाठी नवी नाही. एकेकाळी म्हणजे साधारण ६०-७० च्या दशकात दाक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने मुंबईत डेरेदाखल झाली होती. बँका, बड्या कंपन्यांमध्ये दाक्षिणात्य मंडळींचा टक्का वाढत होता. यामुळे भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याची भावना वाढीस गेली आणि यातून शिवसेनेचा जन्म झाला. मराठी अस्मिता जपण्यासाठी आणि भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागले. दरम्यानच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ नारा दिला आणि शिवसैनिक विरुद्ध दाक्षिणात्य असा वाद विकोपाला गेला. त्यानंतर स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना बँका, मोठ्या कंपन्या, सार्वजनिक उपक्रम, सरकारी कार्यालये, पंचतारांकित हॉटेल्स आदींमध्ये नोकरी मिळविण्याचा संकल्प सोडण्यात आला आणि हा संकल्प शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून तडीस नेण्यात आला, हा झाला इतिहास. परंतु त्याचे स्मरण आजही निवृत्तीकडे झुकलेल्या मुंबईकरांच्या मानत रुंजी घालत आहे.
मुंबईमध्ये ६०-७० च्या दशकात जसे दाक्षिणात्य आले. त्यानंतरच्या कालखंडात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतून मोठ्या संख्येने परप्रांतीय मुंबईत आले आणि अजूनही येतच आहेत. मराठी विरुद्ध दाक्षिणात्य संघर्षाचा धसका घेऊन अन्य राज्यांतील परप्रांतीय गुण्यागोविंदाने मुंबईत नांदत होते. मात्र काही वर्षांपूर्वी पुन्हा एकदा मराठी भाषकांवर अन्याय होत असल्याची भावना विकोपाला गेली आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आदी राज्यांमधून रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या ‘भय्यां’विरोधात खळ्ळखट्याक सुरू झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फर्मान सोडले आणि मनसैनिक रस्त्यावर उतरवले. परप्रांतीयांच्या टॅक्सी-रिक्षा फोडण्यात आल्या, परप्रांतीय फेरीवाल्यांना मारहाण झाली. मनसेविरुद्ध परप्रांतीय असा वाद विकोपाला गेला. या संघर्षाच्या भीतीपोटी अनेक परप्रांतीयांंनी आपल्या राज्याची वाट धरली. आता आणखी एक संघर्ष सुरू झाला आहे आणि तो म्हणजे मराठी विरुद्ध जैन समाज.
बाकानगरी मुंबईचे देशभरात सर्वांनाच आकर्षण आहे. म्हणून नोकरी-व्यवसायाच्या शोधात परप्रांतीय मंडळी मुंबईत डेरेदाखल होत आहेत. तशी जैन समाजातील मंडळीही मुंबई आली आणि येत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी मुंबईत आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. इतकेच नव्हे तर आपली संस्कृती, परंपराही ते मुंबईत जोपासत आहेत. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये या समाजाचे वर्चस्व वाढू लागले आहे. राजकीय छत्रछायेमुळे अनेक भागांत त्यांच्या मतपेढ्या निर्माण झाल्या आहेत. यातूनच आता मराठी विरुद्ध जैन समाज असा संघर्ष टिपेला पोहोचला आहे.
पश्चिम उपनगरातील जैन मंदिरावर झालेली कारवाई, कबुतरखान्यांवरील कारवाई आणि त्यानंतर जैन समाजाने केलेला संघर्ष, जैन मुनींनी कबुतरखान्यांवरून केलेले संघर्षाचे भाष्य, त्याला मराठी नेते मंडळींनी दिलेले आव्हान, जैन समाजाच्या संस्थेच्या झोळीत टाकण्यात आलेला मरिन ड्राइव्ह येथील विल्सन जिमखाना, दर रविवारी वाजतगाजत काढण्यात येणाऱ्या जैन समाजाच्या मिरवणुका, मांसाहारींना टोलेजंग इमारतींमध्ये मराठी भाषकांना नाकारण्यात येणाऱ्या सदनिका, मासळी विक्रेत्या महिलांना काही भागात मासे विक्रीला करण्यात आलेली बंदी, जैन समाजाच्या मंदिरांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्याबाबत केलेले आवाहन, अशा एक ना अनेक कारणांमुळे मराठी विरुद्ध जैन असा संघर्ष टिपेला पोहोचला आहे. काही अमराठी राजकारणी मतपेढी जपण्यासाठी या संघर्षात तेल ओतून तो भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटू लागले आहेत.
मुंबईत आलेले परप्रांतीय आपल्यावर अन्याय करीत आहेत, अशी भावना तमाम मराठी भाषकांच्या मनात घर करून आहे. परंतु मराठी भाषकांनी शांत चित्ताने विचार करण्याची वेळ आली आहे. परप्रांतीय आपल्या राज्यातून येताना काय घेऊन येतो, त्याच्या रोजगाराचाही पत्ता नसतो. पण मुंबई कुणालाही उपाशी ठेवत नाही हे परप्रांतीयांनी सिद्ध करून दाखवले आहे. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ही मंडळी श्रीमंतांच्या पंक्तीत स्थान मिळवतात. गावातील बेरोजगार तरुणांना मुंबईत आणून आपल्या व्यवसायात सामावून घेतात. याउलट मराठी भाषकांची स्थिती आहे.
मराठी माणसाचे कोठे चुकते?
एकेकाळी संयुक्त कुटुंबात नांदणाऱ्या भावंडांमधील वाद विकोपाला जाता आणि वाडवडिलांच्या जागा विकून पैशांची विभागणी करून मराठीजन उपनगरांचा रस्ता धरतात. भावकीतील वाद मराठी भाषकांच्या मुळावर उठला. त्यामुळेच बहुतांश मराठी भाषकांच्या कुटुंबांना मुंबईतून हद्दपार व्हावे लागले. मराठी भाषक उत्सवप्रिय, नोकरी गेली तरी बेहत्तर, पण गणेशोत्सव, होळी आदी सणांना गावची वाट धरणारच. अशा मानसिकतेमुळे मराठी भाषक आज मागे पडत आहे. केवळ आपल्या चुका, त्रुटी, जिद्दीचा अभाव आदींवर पांघरुण घालून परप्रांतीयांवर खापर फोडण्यात मराठी भाषक धन्यता मानत आला आहे. परप्रांतीयांनी निर्माण केलेल्या स्पर्धेला तोंड देण्याची, टिकण्याची, पुढे जाण्याची जीद्दच मराठी माणसात नाही. ती जीद्द दाखवली तर मुंबई आम्ही चालवतो असे म्हणण्यास परप्रांतीय धजावणार नाही. पण…
