लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातील विविध जिमखान्यांवरील अति-तीव्रतेचे प्रखर दिवे आणि जाहिरात फलकांमुळे (बिलबोर्ड्स) प्रकाश प्रदूषणात वाढ झाली आहे. याचा या परिसरातील रहिवाशांसह पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करणारी याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. न्यायालयानेही या याचिकेची दखल घेऊन राज्य सरकार, महापालिका, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी), राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून आरोपांप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
दक्षिण मुंबईतील रहिवासी आणि आयटी व्यावसायिक तसेच खगोल-छायाचित्रकार असलेल्या निलेश देसाई यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, २०१६ पासून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही ही समस्या अद्यापही कायम असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.
देसाई यांनी याचिकेत, विल्सन जिमखानासह या परिसरातील इतर जिमखाने आणि आस्थापनांमधील प्रकाशयोजनेमुळे होणाऱ्या प्रकाश प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच, मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रकाश प्रदूषण नियंत्रित ठेवणारी नियमावली तयार करण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या अति-कृत्रिम प्रकाशामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य आणि झोपेवर परिणाम होत असून झाडे आणि वन्यजीवांचेही नुकसान होत आहे. वाहन चालवताना थेट डोळ्यांवर येणारा प्रखर प्रकाश आणि वाहनचालकांसाठी दृश्यमानतेच्या दृष्टीने धोक्याचा असून त्याबाबतही याचिकेत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये विल्सन जिमखान्याच्या व्यवस्थापकाला बजावलेल्या नोटीसीचा संदर्भही याचिकेत देण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह परिसरासाठीच्या सर्वसाधारण धोरणांतर्गत पोलीस जिमखाना मैदानाच्या आसपासच्या परिसरात प्रकाशयोजना व जाहिरातींचे फलक लावण्यास परवानगी नाही. त्याबाबत ३० जून २०१७ मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीच्या बैठकीतील इतिवृत्तांमध्येही नमूद केल्याचे याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणी जानेवारी २०१८ मध्ये मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण धाव घेतली होती. त्यांनाही समस्येबाबत माहिती देण्यात आली, मात्र, उपाययोजना करूनही अति-प्रकाशयोजनेचा त्रास सुरूच असल्याचा आरोप देसाईनी केला आहे.
याचिकेतील प्रमुख मागण्या
याचिकेत विल्सन जिमखान्याजवळील प्रकाश तीव्रता ८४,८०० लक्सपर्यंत (एखाद्या पृष्ठभागावर पडणाऱ्या तीव्र प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक) असल्याचे, तर मरीन ड्राइव्ह सभोवतालची प्रकाश पातळी सुमारे २,१०० लक्स असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात योग्य नियमावली करून अधिकाऱ्यांना त्यांची अंमलबजावणी करण्याचे, प्रकाशाची स्वीकारार्ह पातळी निर्धारित करण्याचे, खालच्या दिशेने झाकणारे दिवे (डाउनवर्ड-शील्डेड फिक्स्चर्स) अनिवार्य करण्याचे आणि ‘डार्क स्काय फ्रेण्डली’ क्षेत्र तयार करण्याबाबत विचार करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेत केली आहे. तसेच, रात्री १० नंतर तीव्र प्रकाशव्यवस्थेवर निर्बंध घालण्याची मागणीही केली आहे.
