मुंबई : मध्य रेल्वेवरील मशीद रेल्वे स्थानकादरम्यानचा भंडारी स्ट्रीट आणि संत तुकाराम मार्ग यांना जोडणारा भंडारी पालिका सार्वजनिक रेल्वे पादचारी पूल धोकादायक बनल्यामुळे तातडीने प्रवाशांसाठी बंद करण्यात आला. नवीन पादचारी पुलाच्या उभारणीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून, मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभाग अभियंता (पूल/ओएचएस) कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, सीएसएमटी – मशीद स्थानकांदरम्यान किलोमीटर ०.८८० वरील भंडारी पालिका सार्वजनिक पादचारी पूल (सीएसएमटी बाजू) शनिवारपासून बंद करण्यात आला. या पुलाच्या जागी लवकरच नवीन पादचारी पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पूल बंद असताना पूर्व-पश्चिम दिशेने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आणि रेल्वे प्रवाशांनी मशीद रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या बाजूचा पालिका सार्वजनिक पादचारी पूल, सिंदूर पूल किंवा युसूफ मेहरअली रोड या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी संबंधित स्थानकांवर सार्वजनिक सूचना देण्यात येणार आहेत. तसेच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलीसांचे कर्मचारी मार्गदर्शनासाठी तैनात करण्यात येणार असून, मशीद स्थानकावर नियमित ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना दिल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना बंद करण्यात आलेल्या पुलावरून जाण्याचा प्रयत्न न करता केवळ अधिकृत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

वसई रोड – दिवा कॉर्ड मार्गावरील वसई रोड स्थानक परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने गाडी क्रमांक २०९३१ ही कामण रोड स्थानकावर दुपारी ३.१७ ते ३.५१ या वेळेत थांबविण्यात आली. तसेच गाडी क्रमांक २०९१९ चा वेग कमी करण्यात आल्याने तिला वसई रोड विभाग पार करण्यास विलंब झाला. गाडी क्रमांक ६१००६ दिवा – वसई रोड मेमू खारबाव येथे दुपारी ३.२० ते दुपारी ३.५२ दरम्यान थांबविण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

वसई, नालासोपारा, विरार आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा दिवसभर संथगतीने धावली. विरारकडे जाणाऱ्या आणि तेथून मुंबईकडे येणाऱ्या लोकल २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी, वसई रोड, नालासोपारा, विरार, भाईंदर, बोरिवली आणि अंधेरी या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.