मुंबई : शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या मुंबईतील ५० शिक्षकांची आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली आहे. महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या नावांची घोषणा केली. १० वर्ष निष्कलंक सेवा, पटनोंदणी व गळती रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांसाठी केलेले लेखनकार्य, शिक्षकांची अध्यापन पद्धती आदी विविध बाबींचा विचार करून १२१ शिक्षकांमधून ५० शिक्षकांची निवड करण्यात आली.
महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात या पुरस्कारांची घोषणा झाली. त्यावेळी शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. सन १९७१ मध्ये तत्कालीन शिक्षण समिती अध्यक्षा शांती पटेल व शिक्षणाधिकारी माधुरीबेन शहा यांच्या कारकिर्दीत महापौर पुरस्कार देण्याची प्रथा सुरू झाली. सुरुवातीला केवळ दोनच शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी सुधारणा करत ही संख्या आता ५० वर पोहोचली आहे.
प्रत्येकी ११ हजार रुपये, मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले सुवर्णपदक, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, फेटा, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माटुंग्यातील सिटी ऑफ लॉस एंजलिस मनपा मराठी शाळेत तीन दिवस निवड समितीने पुरस्कारासाठी अर्ज केलेल्या १२१ शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून ५० शिक्षकांची निवड करण्यात आली. या पुराकारासाठी पुढील काळात शिक्षकांची संख्या, तसेच पुरस्काराची रक्कम वाढविण्यात येणार असल्याचे शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी सांगितले.
माध्यम शिक्षकांची संख्या
मराठी – २०
हिंदी – १०
इंग्रजी – १०
उर्दू – ८
गुजराती – १
कन्नड -१
