मुंबई: भायखळ्याच्या राणीच्या बागेत असलेल्या महापौर बंगल्यांच्या डागडुजीसाठी मुंबई महापालिकेच्या कार्यकारी अभियंता विभागाने निविदा मागवल्या आहेत. या बंगल्याची दुरुस्ती दोन टप्प्यात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यासाठी १ कोटी ४८ लाखांच्या खर्चाचा अंदाज आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी ११ फेब्रुवारीला निवडणूक झाली. महापौर पदी रितू तावडे यांची निवड झाली. मात्र निवडणूक होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही महापौर रितू तावडे यांनी अद्याप महापौर निवासस्थानात प्रवेश केलेला नाही. भायखळा येथील राणीच्याबागेत सध्या महापौर निवासस्थान असून या बंगल्याची पुन्हा एकदा डागडुजी करण्यात येणार आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून बंद असलेल्या या बंगल्याच्या सजावटीसाठी मुंबई महापालिकेच्या कार्यकारी अभियंता विभागाने गुरुवारी निविदा मागवल्या आहेत.
दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत आता दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होत आहे. त्यामुळे महापौरांचे निवासस्थान भायखळ्यातील राणी बागेतील पुरातन बंगल्यात हलवण्यात आले आहे. यापूर्वी विश्वनाथ महाडेश्वर महापौर असतानाच हे निवासस्थान या बंगल्यात हलवण्यात आले होते. राणी बागेतील हा बंगला १९३१ साली बांधण्यात आला. ब्रिटीशांच्या सोयीसाठी हा बंगला बांधण्यात आला होता. १९७४ पासून हा बंगला महापालिकेतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थानही बनले होते. त्यानंतर याचा वापर महापौरांसाठी होऊ लागला. राणी बागेतील बंगला साधारण सहा हजार चौरस फुटांचा आहे.
राणी बागेतील पाटणवाला मार्गाला समांतर असलेला व सागवान लाकडाची संरचना असलेला कौलारू बंगला आहे. प्रशासक काळात या बंगल्याचा वापर होत नसल्याने काही ठिकाणी वाळवी लागली होती. तर काही लाकडी फर्निचरचीही दुरावस्था झाली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या काही महिने आधीच या बंगल्याची डागडुजीचे काम हाती घेतले. या कामासाठी निविदा काढून कंत्राटदाराला काम देण्यात आले. संरचनात्मक दुरूस्ती, कौलांच्या आधारलाकडाची दुरूस्ती, पेटिंग व पॉलिशिंगची कामे, वाळवी प्रतिरोधक कामांसह अन्य कामे कंत्राटदारांकडून करण्यात आली. ही कामे पूर्ण झाली असून आता बंगल्याच्या अंतर्गत सजावटीसाठी कार्यकारी अभियंता विभागाने निविदा मागवल्या आहेत.
प्रवेश पावसाळ्यानंतरच…
महापौर रितू तावडे यांच्या सूचनेनुसार बंगल्यातील अंतर्गत सजावट नवीन फर्निचर काही किरकोळ दुरुस्ती करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने निविदा मागवल्या असून पहिल्या टप्प्यातील किरकोळ दुरुस्ती फर्निचर यासाठी तब्बल १ कोटी ४८ लाख ११ हजार ९०२ रुपये खर्च करण्यात येणार आहे. किरकोळ दुरुस्ती डागडुजी याला पावसाळा धरून किमान पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने महापौर रितू तावडे यांचा बंगल्यावरील प्रवेश पावसाळ्यानंतरच होणार आहे.
महापौर अद्यापही घाटकोपरच्या निवासस्थानी वास्तव्यास…
‘मी आजही घाटकोपर येथील माझ्या निवासस्थानी वास्तव्यास आहे. मुंबई महापौर निवासस्थानाच्या (भायखळा) दुरुस्तीबाबत मी महानगरपालिका प्रशासनाकडे कोणतीही स्वतंत्र मागणी केलेली नाही. महापौर निवासस्थान ही महानगरपालिकेची मालमत्ता आहे. त्याच्या देखभाल व आवश्यक दुरुस्तीचे निर्णय संबंधित प्रशासकीय विभागाकडून नियमित प्रक्रियेनुसार घेतले जातात. कृपया त्या प्रशासकीय प्रक्रियेशी माझा कोणताही संबंध जोडू नये, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
