मुंबई : मुंबईमधील महापौर बंगल्यात आणखी सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. बंगल्याच्या बाहेरील जागेत विविध सोयी-सुविधा देण्याकरीता मुंबई महापालिका प्रशासनाने २.८९ कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये या बंगल्याच्या सुधारणेसाठी ३.४० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयातील महापौर बंगल्याच्या परिसरातील विविध सोयी-सुविधांसाठी प्राणीसंग्रहालय संचालकांनी निविदा मागवल्या आहेत. यापूर्वी बंगल्याच्या डागडुजीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असून नूतनीकृत बंगल्यात महापौर रितू तावडे या

वास्तव्यासाठी गेल्यानंतर आता बंगल्याच्या बाहेरील जागेतील सुधारणेसाठी पुन्हा निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदा दस्तऐवजानुसार, या प्रकल्पांतर्गत ई. एस. पाटनवाला रोडलगत ध्वनीशोषक (नॉइज बॅरिअर पॅनेल्स) बसविण्यात येणार आहेत. यामुळे वाहतुकीमुळे होणारा आवाज कमी होण्यास मदत होईल. तसेच सांडपाणी वाहिनी, पर्जन्यजल वाहिनी आणि अन्य उपयुक्तता वाहिन्या टाकण्यात येणार असून त्यावर इंटरलॉकिंग काँक्रीट पेव्हर्स बसविण्यात येणार आहेत.

याशिवाय भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्यांचे बांधकामही करण्यात येणार आहे. बंगल्यात पाणी साठवण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे हे काम करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नोकर व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निवास खोल्यांचे नूतनीकरण, तसेच यांत्रिक आणि विद्युत कामेही या प्रकल्पात करण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील महत्त्वाचा भाग म्हणजे कंटेनरमधील आधुनिक परिषद सभागृह (कॉन्फरन्स हॉल) उभारणे. त्यासाठी अंतर्गत आणि बाह्य सुशोभीकरणासह आवश्यक फर्निचरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या सगळ्या कामांचा या निविदेत समावेश असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, प्रशासक काळात या बंगल्याचा वापर होत नसल्याने काही ठिकाणी वाळवी लागली होती. तर काही लाकडी फर्निचरचीही दुरावस्था झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या काही महिने आधीच या बंगल्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी निविदा काढून कंत्राटदाराला काम देण्यात आले. संरचनात्मक दुरूस्ती, कौलांच्या आधारलाकडाची दुरूस्ती, रंगरंगोटी, वाळवी प्रतिरोधक कामांसह अन्य कामे कंत्राटदारांकडून करून घेण्यात आली. मात्र

महापौरपदी निवडून आल्यानंतर रितू तावडे यांनी बंगल्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी त्यात आणखी बदल सुचवले होते. त्यामुळे या बंगल्याची पुन्हा डागडुजी करण्यात आली. तर आता पुन्हा बंगल्याच्या बाहेरील जागेतील दुरुस्तीसाठी आता निविदा मागवण्यात आल्या आहेत.

बंगला कधीपासून…

दादर शिवाजी पार्क मैदानाजवळील समुद्राला लागून असलेल्या महापौर बंगल्यात पूर्वी महापौर वास्तव्य करीत असत. परंतु हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जमिनीवर बाळासाहेबांचे स्मारक साकारण्यात येत आहे. त्यामुळे राणी बागेतील बंगला हेच महापौरांचे निवासस्थान जाहीर करण्यात आले. महापौरांचा हा १९३१ मध्ये बांधण्यात आलेला वारसा दर्जाचा (हेरिटेज) बंगला असून तो सुमारे ६००० चौरस फूट क्षेत्रफळाचा आहे. सागवान लाकूड आणि पारंपरिक कौलारू असलेल्या या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे.