मुंबई : भायखळ्याच्या राणीच्या बागेतील महापौर बंगल्यात सोयीसुविधांसाठी आणखी सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याच्या वृत्तानंतर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यामुळे अखेर याबाबतची निविदा प्रशासनाने संध्याकाळी उशीरा रद्द केली. बंगल्याच्या सुधारणेवर उधळपट्टी होत असल्याचे आरोप झाल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी ही निविदा रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयातील महापौर बंगल्याच्या परिसरातील विविध सोयी-सुविधांसाठी प्राणीसंग्रहालय संचालकांनी निविदा मागवल्या होत्या. महापौर बंगल्याच्या सुधारणेवर आतापर्यंत दोनदा खर्च केलेला असताना पुन्हा एकदा निविदा काढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये या बंगल्याच्या सुधारणेसाठी ३.४० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यातच आता पुन्हा एकदा २.८९ कोटींच्या कामासाठी निविदा काढल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटले. दिवसभर विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी या विषयावरून महापौरांवर टीका केली.

महापौरांनी आरोप फेटाळले..

दरम्यान, बुधवारी महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही निविदा महापौरांच्या बंगल्याशी संबंधित नसल्याचा दावा केला. महापौरांचे निवासस्थान हे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात आहे. संपूर्ण उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील देखरेख, दुरुस्ती, परिरक्षण विषयक कामे संबंधित उद्यान आणि प्राणिसंग्रहालय विभागाकडून हाती घेतली जातात.

महापौर निवासस्थान हे हेरिटेज प्रकारातील असून त्याच्याशी निगडित कामे पुरातन वास्तू देखभाल विभाकडून केली जातात. ही निविदा या विभागाने काढलेली नाही,असेही महापौरांचे म्हणणे आहे. संबंधित निविदा आणि त्यामध्ये नमूद कामे ही महापौर निवासस्थानात नव्हे तर आजुबाजूच्या आणि एकूणच प्राणिसंग्रहालय परिसरातील आहेत. या कामांमध्ये महापौर निवासस्थानाचा उल्लेख केल्यामुळे ही निविदा रद्द करण्याचे आदेश दिल्याचे महापौरांनी सांगितले.

महापौरांना या निविदेविषयी काहीही माहिती नाही अथवा माहीत असायचे कारण नाही. तसेच, महापौरांनी या कामांची विनंती केलेली नाही. प्रस्तावित कामे ही महापौर बंगल्याच्या आतील नाहीत असे महापौर कार्यालयाचे म्हणणे आहे. बंगल्यात सध्या साधा खिळा ठोकण्याचे कामही सुरू नाही. आपण याबाबतचे कोणतेही काम सांगितलेले नाही असेही महापौरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. या निविदा प्रक्रियेशी, त्यातील कामाशी महापौरांचा संबंध जोडू नये असेही महापौरांनी म्हटले आहे.

महापौरांचे नाव घेऊन दुकाने चालवतात ..

महापौरांच्या नावाने आरोप आपली दुकाने चालवली जातात असा आरोप महापौर रितू तावडे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाने केला आहे. चुकीच्या गोष्टी पसरवून शिवसेना पक्षाच्यावतीने राजकारण केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.खर्चा पे चर्चा .. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी महापौर बंगल्यावरील या खर्चाबाबत समाजमाध्यमांवरून टीका केली आहे. महापौरांच्या बंगल्यावर मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. आधीच नुतनीकरण केलेल्या बंगल्याच्या सुधारणेसाठी आणखी खर्च केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याचकरीता भाजपला पालिकेवर सत्ता आणायची होती असाही खोचक आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.