मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी येत्या ११ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यावेळी महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून बहुप्रतीक्षित अशी ही निवडणूक आता लवकरच होणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या शनिवारी ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. त्यामुळे मुंबईचा महापौर कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचे आणि मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या. शिवसेना (ठाकरे) पक्षाला ६५, तर मनसेला सहा जागा मिळाल्या. निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असून या काळात शिवसेना (ठाकरे), मनसे, कॉंग्रेस, एमआयएम या पक्षांनी कोकण भवन आयुक्तांकडे आपली गटनोंदणीही केली. मात्र स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांनी अद्याप गटनोंदणी केली नव्हती.

गटनोंदणी स्वतंत्र की संयुक्त करायची यावरून या दोन पक्षांचे घोडे अडकले होते. अखेर सोमवारी या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र गटनोंदणी केली. भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांची बैठक पार पडली. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी ठराव करून आपले गटनेते जाहीर केले. भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची नियुक्ती झाली असून तेच सभागृह नेते असतील. तर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची निवड करण्यात आली. या दोन प्रमुख निवडीनंतर आता महापौर आणि उपमहापौर कोण होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

पालिका आयुक्त पीठासीन अधिकारी…

मुंबईच्या महापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी तीन दिवस आधी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाते. ७ व ८ फेब्रुवारी रोजी शनिवार आणि रविवार असल्यामुळे ६ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरूवात होईल. तसेच यावेळी महापौर पदाच्या निवडीसाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे पीठासीन अधिकारी असतील. दरवेळी मावळते महापौर हे अध्यक्षस्थानी असतात. यंदा पालिकेचा कार्यकाळ संपून चार वर्षे झाल्यामुळे आयुक्त अध्यक्षस्थानी असतील. महापौर व उपमहापौरांची निवड नेहमीप्रमाणे आवाजी मतदानाने होणार आहे.