मुंबई : महापालिकेतील सत्तावाटपाबाबत भाजप-शिवसेनेत मंगळवारी रात्री चर्चेला सुरुवात झाली. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नवी दिल्लीत प्राथमिक चर्चा झाली असून महापौरपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत होणार आहे. शिवसेनेला कोणत्या समित्यांवर किती स्थान द्यायचे, याबाबत चर्चा सुरु झाली असून स्थायी, बेस्ट, आरोग्य, सुधार आदी महत्वाच्या समित्यांपैकी काही समित्या देण्याची मागणी शिवसेनेने भाजपकडे केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या निवडीनिमित्ताने भाजप व शिवसेनेचे नेते दिल्लीला गेले असल्याने चर्चेची पहिली फेरी तेथेच पार पडली.

भाजपला ८९ तर शिंदे यांच्या शिवसेनेला २९ जागांवर विजय मिळाला. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची नोंद विभागीय आयुक्तांकडे करण्यासंदर्भातील तांत्रिक बाबींविषयी साटम व शेवाळे यांच्यात चर्चा झाली. भाजपला बहुमतासाठी शिवसेनेची (शिंदे) गरज असल्याने अडीच वर्षे महापौरपद आपल्याही वाट्याला यावे आणि स्थायी, बेस्ट, सुधार आदी महत्वाच्या समित्यांपैकी काही समित्यांची अध्यक्षपदे व या समित्यांमधील सदस्यपदे शिवसेनेलाही मिळावीत, अशी नेत्यांची आग्रही मागणी आहे. महापौरपदासाठी २२ जानेवारीला आरक्षणाची सोडत आहे. महापौरपद कोणत्या संवर्गासाठी आरक्षित होईल आणि दोन्ही पक्षांकडे त्या संवर्गातील महापौरपदाचा सुयोग्य उमेदवार कोण, यादृष्टीने फडणवीस व शिंदे यांच्या बैठकीत चर्चा होवून निर्णय होईल, असे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. मात्र भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने महापौर भाजपचाच होईल, असे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले.

महापालिकेतील समित्या आणि नगरसेवकांच्या नोंदणीसंदर्भात आमची चर्चा झाली. महापौर कोणाचा होईल, भाजपला ठाकरे गट पाठिंबा देणार आहे, याबाबत अनेक वावड्या उठल्या असून महापौर महायुतीचाच होईल, असे साटम यांनी सांगितले.

महापौरांची निवड ३०-३१ जानेवारीला?

महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढल्यानंतर तातडीने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी भाजप-शिवसेना नेत्यांची अपेक्षा आहे. महापौर निवडणुकीसाठी आठवडाभराची नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही निवडणूक ३०-३१ जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल.