Mumbai Mayor Ritu Tawde Sanjay Ghadi Deputy Mayor: तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आज प्रशासकीय राजवट संपली असून मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा महापौर, उपमाहापौर आणि नगरसेवक मिळाले. महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे) पक्षाचे संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्याची औपचारिकता पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या महापौरांची निवड झाली.
मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजपतर्फे महापौरपदासाठी घाटकोपरच्या नगरसेविका रितू तावडे यांनी अर्ज भरला, तर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वाट्याला उपमहापौर पद आले. दहिसरमधील नगरसेवक संजय घाडी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला. विरोधी बाकांवरील कोणीही अर्ज न भरल्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे आज विशेष सभेत जाहीर करण्यात आले. पालिका आयुक्त भूषण गगराणी हे विशेष बैठकीचे पिठासीन अधिकारी होते. तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि महापालिका सचिव मंजिरी देशपांडे उपस्थित होत्या.
या घोषणेनंतर महायुतीच्या नगरसेवकांनी घोषणा देत नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौराना आसनावर बसवले. यावेळी ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ अशा घोषणा देण्यात आल्या. महापौर कोणाचा महायुतीचा ‘आवाज कुणाचा मुंबईकरांचा’ अशा घोषणा देण्यात आल्या. ‘मोदी मोदी’, ‘देवा भाऊ, देवा भाऊ..” अशा महायुतीच्या घोषणा आणि शिवसेना ठाकरे पक्षाकडून ‘ठाकरे… ठाकरे’ अशा घोषणा देत सभागृहात सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रवेश केला.
पन्नास खोकेची घोषणा
उपमहापौर पदी शिवसेना (शिंदे) पक्षाचे संजय घाडी यांच्या नावाची घोषणा होताच ठाकरेंच्या शिवसेनेने ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करून शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचले.
आधी आदरांजली..
भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटाचे नगरसेवक आज सकाळीच पालिका मुख्यालयात जमले होते. भगव्या रंगाचे कपडे आणि भगवे फेटे घालून सगळे नगरसेवक उत्साहात हजर होते. हुतात्मा चौक येथे जाऊन शिवसेना (शिंदे) व भाजपच्या नगरसेवकांनी हुतात्म्याना आदरांजली वाहिली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला ८९ , शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या, तर शिवसेना (शिंदे) पक्षाकडे ६५ नगरसेवक, मनसेचे सहा नगरसेवक आहेत. कॉंग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत.
