“…एवढे तास कुठे निजला होतात”, आशिष शेलारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर महापौर पेडणेकरांची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार

मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच हा माझा आणि समस्त स्त्री जातीचा अवमान असल्याचा आरोप केलाय. यावेळी त्यांनी आशिष शेलार यांच्या या वक्तव्याविरोधात पोलीस तक्रार करत असल्याचंही नमूद केलं.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “३० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी ४ महिन्यांच्या बालकाची प्रकृती गंभीर असल्याने बाळ दगावले. यानंतर वडिलांचेही निधन झाले. या घटनेबाबात ४ डिसेंबरला आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ‘सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात’ असे वक्तव्य केले.”

“महिला महापौर असताना माझ्याबाबत उद्गारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह”

“मुंबईचे महापौर प्रथम नागरिक असून ते अत्यंत महत्त्वाचे पद आहे. महिला महापौर असताना माझ्याबाबत उद्गारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या या वक्तव्यांचा मी निषेध व्यक्त करते. त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे माझा आणि समस्त स्त्री जातीचा अवमान केला आहे. त्यामुळेच मी त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार नोंदवत आहे,” असं किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पत्रात नमूद केलं.

महापौरांच्या तक्रारीनंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर शेलार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “महापौर व महिलांचा अवमान केल्याची तक्रार महिला आयोग, पोलिसांकडे जे करीत आहेत, त्यांनी पत्रकार परिषद एकदा निट पूर्ण ऐकावी. मी जे बोललोच नाही, ते महापौरांशी जोडून हेच महापौरांचा अवमान करीत आहेत. जाणीवपूर्वक सत्याकडे दुर्लक्ष केले जात असेल, तर मलाही कायदेशीर मार्ग पत्करावा लागेल.”

आशिष शेलार काय म्हणाले होते?

आशिष शेलार म्हणाले होते, “७२ तास तुम्ही का पोहचला नाही? करून दाखवलं म्हणता ना, मग कुठं निजवून दाखवलं होतं? झोपला कुठं होतात? झोपला कुठं होतात या अर्थाने मी हा शब्द वापरतो आहे. निजणं म्हणजे झोपणं. या अर्थाने झोपला कुठं होतात हा प्रश्न विचारला तर यात गैर काय?”

हेही वाचा : “हे सरकार म्हणजे ३ पैशांचं सरकार, पुत्र, पुत्री आणि पुतण्या…”, आघाडी सरकारच्या दोन वर्षांवर आशिष शेलार यांचा हल्लाबोल

“मुंबई पालिकेत चाललंय काय? रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जात असेल आणि तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी रुग्णालयात पोहचल्या,” असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai mayor kishori pednekar complaint against ashish shelar pbs

ताज्या बातम्या